Join us

Soybean Bajar Bhav : बार्शी बाजार समितीत सोयाबीनची मोठी आवक कसा मिळाला दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:38 IST

यंदा वेळेवर झालेला पाऊस अन् पेरणी यामुळे जोरात आलेली पिके, त्यामुळे यावर्षी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद अन् सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

बार्शी : यंदा वेळेवर झालेला पाऊस अन् पेरणी यामुळे जोरात आलेली पिके, त्यामुळे यावर्षी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद अन् सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या हंगामातील या दोन महिन्यांत पाच लाख कट्टे उडदाची आवक झाली.

उडदाला किमान पाच हजार ते कमाल ८२०० प्रतिक्विंटल दर मिळाला. तर सोयाबीनची सोमवारी ४५ हजार कट्टे आवक झाली आहे. सोयाबीनला ३८०० ते ४२५० दर मिळत आहे. मागील पंधरा दिवसांत सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे ३५० रुपये घट झाली आहे.

यावर्षी सोयाबीन आणि उडीद मालाची विक्रमी आवक झाली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत उडीद आवक कमी होऊ लागली आहे. ऑगस्टमध्ये उडदाला ५००० ते ८६०० रुपयांचा दर मिळाला. या महिन्यात १ लाख कट्टे आवक झाली होती.

सप्टेंबर महिन्यात ४ लाख कट्टे आवक झाली. या महिन्यात ५०००-८२०० रुपये असा दर मिळाला. आता उडदाचे दर टिकून आहेत. सोयाबीनची काढणी आता वेगाने सुरू आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे काढणीला अडचणी निर्माण होत आहेत.

हळूहळू सोयाबीनची आवकही वाढू लागली आहे. मात्र, दुसरीकडे दरात मात्र घसरण सुरू आहे. पावसाच्या दरम्यान काढणी अन् सर्वांची काढणी एकाच वेळेत सुरू असल्याने काढणी आणि मळणीचे हेही दर वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.

एकीकडे शासन शेतमालाला हमी भाव देण्याची अन् तो वाढवून दिल्याची घोषणा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात बाजारात हमी भावापेक्षा सातशे ते आठशे रुपये प्रतिक्विंटल कमी दर मिळत आहे. त्यामुळे शासनाने हमी भाव खरेदी केंद्र तत्काळ सुरू करून शेतकऱ्यांचा होणारा तोटा कमी करावा. - हर्षवर्धन बोधले, शेतकरी

टॅग्स :सोयाबीनबार्शीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी