योगेश गुंडकेडगाव : गेल्यावर्षीच्या दिवाळीपासून शेतकऱ्यांना सोयाबीन दरवाढीची अपेक्षा होती. मात्र, भाववाढ न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मिळेल त्या दराने सोयाबीन विक्री केली. दरम्यान, आता सोयाबीनचे भाव वाढत आहेत.
४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असलेला दर काही दिवसांपासून ४ हजार ४५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, आता शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उपलब्ध नाही.
अहिल्यानगर बाजार समितीत सोमवारी ६६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यास ४२०० पासून ४४५० पर्यंत प्रति क्विंटलचा भाव मिळाला. अहिल्यानगर तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आता सोयाबीन आहे.
चांगला भाव मिळेल, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षापासून शेतमाल विक्री केला नव्हता; परंतु हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनचे दर कमीच होते.
दिवाळी, पाडव्यादिवशी तरी दर वाढतील, अशा अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला; परंतु पदरी निराशाच पडली.
हमीभावात ४३६ रुपये वाढ◼️ मागील वर्षी सरकारने सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये हमीभाव दिला; परंतु प्रत्यक्षात बाजारात या दराने खरेदी-विक्री झाली नाही.◼️ शासनाने नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी केले. दरम्यान, यंदाच्या खरिपातील सोयाबीनसाठी सरकारने ४३६ रुपयांची वाढ करून ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे.
नवीन हंगामाकडे लक्ष◼️ यावर्षी सरकारने हमीभावात ४३६ रुपयांची वाढ केली. त्यामुळे प्रत्यक्ष हंगाम सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम दिसणार आहे.◼️ शासनाने नाफेडमार्फत ४८९२ रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला.◼️ परंतु अनेक अटींमुळे सर्व शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रांवर सोयाबीन विक्री करता आला नाही. परिणामी, अनेकांनी बाजारात मिळेल त्या दराने गरजेनुसार सोयाबीन विक्री केली.
जागतिक घडामोडींचा बाजारावर परिणामसोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा दरावर परिणाम पडतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाला मागणी वाढली आहे.
नाफेडच्या सोयाबीन विक्रीस सुरुवातगतवर्षी शासनाने नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी केली होती. त्यामुळे सोयाबीनचा शासनाकडे मोठा साठा आहे. परिणामी, शासनाने मागील दोन महिन्यांपासून सोयाबीनची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे सध्या सोयाबीनचे दर वाढले असले, तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी होत आहे.
प्रक्रियादार कारखानदारांकडून सोयाबीनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. आगामी काळात आणखी १०० ते २०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. - अमोल राठी, सोयाबीन व्यापारी
अधिक वाचा: Satbara Apak Shera : सातबाऱ्यावरील अपाक शेरा आता लगेच हटवणार; सुरु झाली 'ही' मोहीम