Join us

Sitaphal market : परतवाड्याची चवदार सीताफळे सफरचंदापेक्षा महाग; काय मिळतोय दर वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 12:16 IST

ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात परतवाड्यात सीताफळ दाखल झाले आहे. त्याला काय मिळतोय भाव ते वाचा सविस्तर (Sitaphal market)

Sitaphal market : 

अनिल कडू / परतवाडा : 

ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात परतवाड्यात सीताफळ दाखल झाले आहे. उच्च प्रतीची, पूर्ण वाढ झालेली ही दर्जेदार मोठ्या आकाराची गोड फळे शेतकऱ्यांच्या शेतधुऱ्यावरची आणि सीताफळ बागेतील आहेत. मागील वर्षी हीच फळे सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात परतवाड्यात दाखल झाली होती. 

या सीताफळांची १०० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ विक्री केली जात आहे. आज ग्राहकांना सफरचंदापेक्षा सीताफळाला अधिक किंमत मोजावी लागत आहे. अचलपूर राजस्व विभागात अचलपूर तालुक्यात चंद्रभागा, शहानूर, सपन, बिच्छन नदी तर चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा, चारघड, मेघा नदीकाठच्या परिसरात, लगतच्या जंगली झुडपी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे आहेत. 

ही झाडे नैसर्गिकरीत्या निघालेली आहेत. काही भागात तर सीताफळांच्या झाडांचे जंगल निर्माण झाले आहे. वडगाव, बहिरम, शिरजगाव कसबा, घाटलाडकी, देऊरवाडा, काजळी, ब्राह्मणवाडा थडी परिसरात निसर्गतःच सीताफळ बनाची निर्मिती झाली आहे.

परतवाडा-बैतूल, परतवाडा-अंजनगाव मार्गाच्या दोन्ही बाजूला आणि अचलपूर, चांदूर बाजार तालुक्याला लागून असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी सीताफळाची झाडे बघायला मिळतात. मेळघाटसह अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील डोंगरी परिसरातही सीताफळांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.

राज्यात सर्व दूर प्रसिद्ध 

मध्य प्रदेशसह राज्यात सर्वदूर ही सीताफळे प्रसिद्ध आहेत. या सीताफळांना सर्वदूर मागणी असून पाहता क्षणीच ती ग्राहकांना आकर्षित करतात. ती मधुर व चवदार आहेत.

शासकीय लिलाव

शासकीय जमिनीवरील आणि रोडच्या कडेला असलेल्या सीताफळांच्या झाडांचा, बनाचा लिलाव केला जातो. हा लिलाव घेण्याकरिता दूरदुरून व्यापारी परिसरात दाखल होतात.

टॅग्स :शेती क्षेत्रफळेअमरावतीबाजारशेतकरीशेती