यंदा खरीप हंगामातील नुकसानीला सामोरे जात असताना बाजारातील शेतमालाच्या दराने शेतकरी हवालदिल झाला होता. आज ना उद्या कापसाचे दर वाढतील या आशेवर ठेवलेला अखेर हंगामाच्या शेवटी मिळेल त्या भावात विक्रीस काढला.
आता शेतकऱ्यांचा कापूस संपल्यानंतर कापसाच्या दरात वाढ होत आहे. मागील आठ दिवसांपासून प्रति क्विंटल ३०० रुपयांनी वाढल्याची स्थिती आहे. बाजार समिती यार्डात ७,५२० रुपये प्रति क्विंटल कापसाला दर मिळाला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कापसाच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. हाती आलेल्या कापसाची वेचणी करून दर चांगले मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती.
मात्र, कापूस हातात येताच कापसाचे दर कमी होत गेले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात कापूस सीसीआयला विक्री करण्याला पसंती दिली.
तर, दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांनी समाधानकार भाव नसल्याने घरातच कापूस ठेवणे पसंत केले. मात्र, जानेवारी उजाडला, तरी दर वाढ होत नव्हती. भावळीची अपेक्षा फोल ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापूस विक्री केली.
सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांवर चांगल्या कापसाला ७,५२५ रुपये तर सर्वात कमी ७,१७५ पर्यंत भाव मिळत होता.
सीसीआयचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन बंद
• सीसीआयला कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य करण्यात आले होते. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी १५ मार्च शेवटची तारीख देण्यात आली होती.
• १५ मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्या अशा शेतकऱ्यांना आपला कापूस आगामी काळात शिष्याला विक्री करता येणार आहे. १५ मार्चनंतर सीसीआयने ऑनलाइन रजिस्ट्रेशन बंद केले आहे.
• फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून खाजगी बाजार पेठेतील भावात तेजी दिसून आली. ७,१९० ते ७३२५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यानंतर पुन्हा २० ते २५ रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. ८ मार्चला कापसाला ७ हजार ४३० रुपये दर मिळाला.
• १३ मार्च रोजी ७,५२५ रुपये दर मिळाला मागील आठवड्याभरापासून कापसाच्या भावात तेजी पाहायला मिळत आहे. परिसरातील अंदाजे ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला असून भाववाढ होऊन काय उपयोग असा सवाल उपस्थित होत आहे.
खासगी बाजारपेठेत कापसाला मिळालेला दर
३ मार्च : ७,३६५४ मार्च : ७,३५५५ मार्च: ७,२९०६ मार्च : ७,३३०७ मार्च : ७,३९०८ मार्च : ७,४३०१० मार्च: ७,४८५११ मार्च : ७,४९०१२ मार्च : ७,५१०१३ मार्च : ७,५२५
५.३९ हजार क्विंटल खरेदी
हंगामाच्या सुरुवातीला कापसाला हमी भावापेक्षा जास्त तीनशे ते चारशे रुपये दर मिळत असल्याने शेतकरी सीसीआयला कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत होते. आतापर्यंत शेतकऱ्यांनी ३ लाख २५ हजार क्विंटल कापूस सीसीआयला हमीभावाने विक्री केला आहे. तर २ लाख १३ हजार क्विंटल कापूस खासगी व्यापाऱ्यांना विक्री केला आहे.
हेही वाचा : कर्जमाफी ? छे... वसुलीसाठी मात्र शेतकऱ्यांमागे बँकांचा तगादा लागला