Join us

Onion Rates : गुलटेकडी मार्केट यार्डात कांद्याला 'एवढाच' दर! निर्यातशुल्क हटवल्याचा परिणाम किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 22:17 IST

साधारण २ ते ३ आठवड्यापूर्वी कांद्याचे दर अचानक ४० रूपयांपासून ८ ते १५ रूपये किलोपर्यंत खाली आले होते. त्यानंतर आता कांदा दर समाधानकारक असून अजूनही कांदा दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Pune : केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी कांद्यावर असलेले २० टक्के निर्यातशुल्क हटवण्याची घोषणा केली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कुठे जिवात जीव आला. पण दुसरीकडे बांग्लादेशने कांद्यावरील आयात शुल्क १० टक्के केल्यामुळे शेतकऱ्यांना इकडे आड तिकडे विहीर अशी कोंडी झालीये. सध्या बाजारात येत असलेल्या कांद्यालाही मिळत असलेला दर पुरेसा नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.

पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये २६ मार्च रोजी कांद्याचे दर हे १२ रूपयांपासून १८ रूपयांपर्यंत होते. मागच्या दोन दिवसांत कांद्याची आवक कमी झाल्याचं येथील कमिशन एजंट आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. त्याबरोबरच या निर्यातशुल्क हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा काही परिणाम होणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली. 

दरम्यान, बाजारात सध्या रब्बी कांदा येऊ लागला आहे. खरिपातील लाल कांद्याची आवक कमी झाली असून येणाऱ्या काळात उन्हाळ कांदाही बाजारात येणार आहे. त्यातच १ एप्रिलपासून जरी कांद्यावरील निर्यातशुल्क हटवले असले तरी कांद्याची आवक वाढली तर दर पुन्हा खालीच राहतील असाही अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आवकेवर दराचे सगळे गणित अवलंबून आहेत. 

साधारण २ ते ३ आठवड्यापूर्वी कांद्याचे दर अचानक ४० रूपयांपासून ८ ते १५ रूपये किलोपर्यंत खाली आले होते. त्यानंतर आता कांदा दर समाधानकारक असून अजूनही कांदा दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. ज्या शेतकऱ्यांना सध्या कांदा बाजारात आणायचा आहे, त्या शेतकऱ्यांनी आवक, निर्यात आणि केंद्र सरकारचे धोरणे या सर्व गोष्टींचा विचार करून आणि दर कधी जास्त राहतील याचा विचार करून कांदा बाजारात आणायला हवा. 

टॅग्स :कांदाशेतकरीशेती क्षेत्र