Join us

सोलापूरचा कांदा निघाला कलबुर्गी, बंगळुरुला; कसा आहे कांदा बाजारभाव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 8:48 PM

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मागील आठवड्यापासून कोलमडलेले नियोजन आता पूर्वपदावर येत आहे. नियोजन केल्याने सोमवारी आवक आटोक्यात आली. मात्र, दरातील घसरण सुरूच राहिली आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक आपला माल कर्नाटकातील कलबुर्गी आणि बंगळुरूला घेऊन जात आहेत.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मागील आठवड्यापासून कोलमडलेले नियोजन आता पूर्वपदावर येत आहे. नियोजन केल्याने सोमवारी आवक आटोक्यात आली. मात्र, दरातील घसरण सुरूच राहिली आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक आपला माल कर्नाटकातील कलबुर्गी आणि बंगळुरूला घेऊन जात आहेत. सोलापुरात २००० रुपयात विकला जाणारा कांदा बंगळुरूमध्ये २८०० रुपयांना विकला जातो. खर्च जाऊन सोलापूरपेक्षा ५०० रुपये दर जास्त मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल बंगळुरूकडे अधिक वाढत चालला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणे बंगळुरू बाजारही कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. मागील आठ दिवसांपासून सोलापूर बाजार समितीत आवक वाढल्याने नियोजन कोलमडले. त्यामुळे दरात दररोज घसरण होत आहे. रविवारी टोकन देऊन नियोजन केले, तरीही सर्व गाड्या यार्डात शिरल्या. मात्र, नेहमीपेक्षा आवक कमी आल्याने नियोजन करणे सोपे झाले. जवळपास ८८८ ट्रक कांद्याची आवक होती.

शुक्रवारपेक्षाही सरासरी दरात १०० रुपयांची घसरण झाली. यार्डात गाड्या भरून बाहेर पाठविण्यासाठी रात्री १२ वाजल्यामुळे त्यानंतर गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले. तोपर्यंत जनावर बाजारात गाड्यांना टोकन नंबर देऊन थांबण्याची सोय करण्यात आली होती. रात्री भुसार मार्केटमधून गाड्या सोडण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकरी आता इतर बाजार समित्यांकडे कांदा घेऊन जात आहेत. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी कलबुर्गीला जात आहेत तर बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्यांतील अनेक गावांतील शेतकरी ट्रक भरून बंगळुरूला जात आहेत. गावडीदारफळ, वडाळा, पडसाळी, शेळगाव आर, केमवाडी या भागातील शेतकरी दरवर्षी बंगळुरूला जात आहेत.

रेल्वे तिकीट काढून देतात... राहण्याचीही सोयबंगळूरू मार्केटमध्ये सकाळी ९ वाजता लिलाव झाल्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत बोलावून पटी देतात, तसेच राहण्यासाठी रयत भवनात नियोजन करतात, जेवणासाठी कुपन देतात आणि सोलापूरला येण्यासाठी व्यापारी स्वतः रेल्वेचे तिकीट काढून देतात. जर शेतकऱ्यांना काहीही समजत नसेल, तर त्यांना सोडण्यासाठी हमाल रेल्वे स्थानकापर्यंत येतात. त्यामुळे मागील १२ वर्षांपासून बंगळुरूलाच कांदा विक्रीसाठी पाठवतो, असे गावडी दारफळचे शेतकरी नागेश पवार यांनी सांगितले.

बंगळुरूला माल घेऊन जाण्यासाठी एका पिशवीला ११५ रुपये घेतात. तोच खर्च सोलापूरला घेऊन जाण्यासाठी ३० रुपये आहे. मात्र, सोलापुरात चांगल्या मालाला दर मिळतो. मात्र, गोलटी, फकडी कांद्याला २०० ते ३०० रुपयांचा दर मिळतो. मात्र, बंगळुरूमध्ये साधारण मालालाही कमीत कमी १४०० रुपयांचा दर मिळतो. त्यामुळे साडेचार एकरातील कांदा बंगळुरुलाच पाठवत आहे. - नागेश पवार, शेतकरी, गावडी दारफळ

सोमवारपासून कांदा मार्केट सुरळीतपणे सुरू आहे. गाड्या थांबविण्यासाठी जनावरांच्या बाजारात सोय करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक गेटवर कर्मचारी नेमण्यात आले आहेत. - दत्तात्रय सूर्यवंशी, प्र. सचिव, बाजार समिती

टॅग्स :कांदासोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डबाजारबांगनकर्नाटकशेतकरीपीक