Join us

एकीकडे अवकाळीची भिती दुसरीकडे बाजारात दर नाही; कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांच्या वाढला कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 17:56 IST

Onion Storage : उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही, तसेच अवकाळी पावसाचा ही धोका आहे, परिणामी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

राज्याच्या अनेक बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्यामुळे कांद्याच्या भावात चांगलीच घसरण होत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही, तसेच अवकाळी पावसाचा ही धोका आहे, परिणामी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा चाळींमध्ये टाकण्यास सुरुवात केली आहे.

गतवर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्यामुळे आपसूक यंदा कांदा लागवड वाढली होती. सध्या सर्वत्र उन्हाळी कांद्याची काढणी सुरु झाली आहे. तर राज्याच्या विविध भागात तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह थोड्या प्रमाणात अवकाळी पाऊस होत असल्यामुळे काढलेला कांदा सुरक्षित ठिकाणी पोहोच करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. 

सगळीकडेच बाजारात आवक जास्त होत असल्यामुळे प्रतिकिलो १० ते १८ च्या दरम्यान भाव सध्या मिळत आहे. भावातील घसरण लक्षात घेऊन काढलेल्या कांद्याची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरु आहे. सुसज्ज कांदा चाळ नसणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये वळई लावली आहे तर काहींनी कमी खर्चात तात्पुर्ती व्यवस्था करत कांदा साठवण करत आहेत.

यंदा केंद्र सरकारने निर्यात शुल्क कमी न केल्यामुळे कांदा भाव मोठ्या प्रमाणावर वाढलाच नाही. आता काही दिवसांपूर्वी निर्यात शुल्क कमी केले. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर कांदा आवक बाजार समित्यांमध्ये होऊ लागली आहे.

चाळीतील कांदा बाजारभावानुसार विक्रीचे स्वातंत्र्य

सध्या भाव नसल्यामुळे भविष्यात भाव वाढण्याची अपेक्षा, चाळीतील कांदा बाजारभावानुसार विक्रीचे स्वातंत्र्य त्यातून आर्थिक फायदा होत असल्यामुळे कांदा साठवण केली जाते.

सध्याच्या कांदा दरामध्ये उत्पादन खर्च सुद्धा हाती लागत नाही. अवकाळी पावसाच्या धास्तीमुळे लवकरात लवकर कांदा चाळीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. - सुरेश शेंडगे, कांदा उत्पादक, कोकणगाव, ता. श्रीगोंदा.

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दरमहा उत्पन्न शेत मंजुरांपेक्षाही कमी; कृषी राज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती

टॅग्स :बाजारशेती क्षेत्रशेतकरीशेतीकांदा