नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील निवधा, कोळी, तळणी परिसरात रब्बी हंगामातील हरभरा काढणीची शेतकऱ्यांची कामे जोमात सुरू असून, काही शेतकऱ्यांनी मळणी यंत्रातून काढून बाजारपेठेत विक्रीकरिता आणले. नवीन हरभऱ्याला निवघा बाजारपेठेत खाजगी व्यापारी ५ हजार ४०१ रुपयांत खरेदी करीत आहेत.
रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या उत्पन्नात घट झाली असून, दरवर्षी एक एकरला आठ ते दहा क्विंटल उतारा येतो. यावर्षी मात्र सहा ते आठ क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळत आहे. उत्पादनापेक्षा पेरणी खर्चच शेतकऱ्यांचा जास्त होत आहे.
बाजारपेठेत नवीन तूर दाखल झाली, तेव्हा खाजगी व्यापाऱ्यांनी ७ हजार ३०० रुपये दराने खरेदी केली; परंतु शेतकऱ्यांच्या घरात जसजसे तूर पीक येत आहे तसतसे रोजच्या रोज तुरीचे दर कमी होत आहेत.
सध्या बाजारपेठेत ६ हजार ३०० ते ६ हजार ८०० रुपयांपर्यंत तुरीला दर मिळत आहे. शेती मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने नाफेड केंद्रावर शेतकरी तुरीची विक्री करीत नसल्याचे दिसून येत आहे.