Join us

NCCF Center : १५ शासकीय केंद्रांवर सोयाबीन खरेदी ठप्प; 'एनसीसीएफ' केंद्रांवरील बारदाणा संपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:34 IST

NCCF Center: शेतकऱ्यांना 'एनसीसीएफ'च्या केंद्रावर सोयाबीन विक्री करताना बारदान्याची वाट बघावी लागत आहे.

हिंगोली : सरत्या वर्षाला निरोप तर नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असताना जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची दैना मात्र संपता संपत नसल्याचे चित्र थर्टी फर्स्टच्या दिवशी (३१ डिसेंबर) जिल्ह्यातील 'एनसीसीएफ'च्या(NCCF) सोयाबीन खरेदी केंद्रांवर पाहायला मिळाले. केंद्रांतील बारदाणा संपल्याने शेकडो शेतकरी केंद्राबाहेर रांगेत ताटकळले.

शासनाने यंदा सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात दर ४ हजार ३०० वर जात नसल्याने शेतकऱ्यांचा कल 'एनसीसीएफ'च्या केंद्रांकडे वाढला. २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील १५ केंद्रांवर तब्बल ५१ कोटी ९ लाख ६६ हजार ४६४ रुपयांचे १ लाख ४ हजार ४४९ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली.

मागील चार दिवसांपासून मात्र 'एनसीसीएफ'च्या सर्वच सोयाबीन खरेदी केंद्रांवरील बारदाणा संपल्यामुळे सोयाबीन खरेदी ठप्प आहे. ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी सोयाबीन घेऊन यायचे याची माहिती मेसेजद्वारे देण्यात आली. त्यानुसार शेतकरी वाहनाद्वारे सोयाबीन घेऊन केंद्रात दाखल झाले.

परंतु, या ठिकाणी बारदाणा संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सोयाबीन परतही नेता येत नाही आणि केंद्रावर विक्री करायचे तर बारदाणा नाही, अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

शेतकऱ्यांत नाराजीचा सूर...

सोयाबीनला लागवड खर्चाच्या तुलनेत कवडीमोल दर मिळत आहे. परंतु मोंढा, खुल्या बाजारापेक्षा १०० ते २०० रुपये वाढवून मिळावेत यासाठी शेतकरी 'एनसीसीएफ'च्या केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. या ठिकाणी मात्र आता रांगेत ताटकळावे लागत असल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे.

वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड...

ट्रॅक्टर, टेम्पो किंवा इतर मालवाहू वाहनांकडून एका दिवसासाठी किमान दोन ते अडीच हजार रुपये भाडे आकारण्यात येते. बारदाणाअभावी दोन ते चार दिवसांपासून सोयाबीन खरेदी बंद असल्याने वाहने रांगेत उभी आहेत. या वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. एकीकडे समाधानकारक भाव मिळत नसताना दुसरीकडे भुर्दंडही सोसावा लागत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

बारदाणा उपलब्धतेसाठी प्रयत्न...

एनसीसीएफच्या केंद्रावर बारदाणाअभावी सोयाबीन उत्पादक शेतकरी ताटकळले आहेत. त्यांचे सोयाबीन वाहनातच आहे. बारदाणा होईल तेवढ्या लवकर उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.हे ही वाचा सविस्तर :  Soybean Market : सोयाबीनचे दर स्थिरच; जिल्ह्यातील बाजार समित्यात आवक १८ हजार क्विंटलवर !

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड