संजय लव्हाडे
जालना : बाजारपेठेत ग्राहक कमी असून, बहुतांश वस्तूमालांमध्ये मंदी आहे. नाफेडच्या वतीने सोयाबीनची खरेदी १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. सीसीआयकडूनही कापसाची खरेदी सुरू आहे. नवीन गुळाची आवक सुरू झाली असून नवीन तुरीची आवकदेखील चांगली आहे.
जालनाबाजारपेठेत सोयाबीनची आवक ४५०० इतकी असून भाव ३३०० ते ४६०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. नाफेडमार्फत सोयाबीनची आजपर्यंतची खरेदी ११४९६ क्विंटल इतकी झाली आहे. नवीन तुरीची आवक जालना बाजारपेठेत दररोज ८०० पोती इतकी आहे.
तुरीच्या दरात किंचित तेजी आली असून भाव ६००० ते १०००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. सीसीआयच्या (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) जाचक अटी व खासगी बाजारात पडलेले दर, यामुळे कापूस उत्पादकांची आर्थिक कोंडी होऊ लागली आहे.
सीसीआय प्रतवारी व आर्द्रता तपासूनच भाव देत असल्याने अनेक शेतकऱ्यांना खासगी बाजारात जाण्याशिवाय पर्याय नसून तेथे खरेदीदारांनी भाव पाडले आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शेतकऱ्याच्या कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
कापूस उत्पादनासाठी लागलेला खर्च पाहता मिळत असलेल्या दरात खर्च देखील निघणे शक्य नसून समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून असल्याचे चित्र आहे.
जालना बाजारपेठेत सीसीआयच्या माध्यमातून १२५४२ क्विंटल कापसाची खरेदी झाली असून भाव ७१२४ ते ७४२१ रुपये प्रति क्विंटल असे आहेत. गुळाचे भाव जालना बाजारपेठेत ३५०० ते ३९०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
शेतमाल | बाजार भाव | शेतमाल | बाजार भाव |
गहू | २७०० ते ४००० | मूग | ६६०० ते ७२०० |
ज्वारी | २१०० ते ३५०० | सोयाबीन | ३३०० ते ४६०० |
बाजरी | २४०० ते ३५०० | पाम तेल | १४५०० |
मका | २००० ते २२२५ | सूर्यफूल तेल | १४४०० |
तूर | ६००० ते १०००० | सरकी तेल | १३४०० |
हरभरा | ५१०० ते ६००० | सोयाबीन तेल | १३३०० |
सोन्याच्या दरात घट
• दिवाळीनंतर आता लगीनसराई सुरू झाली आहे. लग्न म्हटल्यावर दागिने घेण्यासाठी लोकांची गर्दी होते.
• सोन्याच्या किमती गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहेत. अशातच शनिवारी सोन्याच्या किमती घसरल्या आहेत.
• सोन्याच्या किमती जवळपास ९०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. जालना बाजारपेठेत सोन्याचे दर ७७५०० आणि चांदीचे दर ९०००० रुपये प्रति किलो असे आहेत.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात