Join us

बाजारपेठेत द्राक्ष मालाची मागणी वाढली; कसा मिळतोय बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 10:30 AM

द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच द्राक्ष मालाचे पडलेले दर सध्या वाढू लागले आहेत. तापमानात वाढ होऊ लागल्याने द्राक्षांची गोडी वाढू लागली आहे. त्यामुळे बाजारपेठेत द्राक्ष मालाची मागणी वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. मात्र, उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे.

उल्हास सूर्यवंशीगव्हाण : द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच द्राक्ष मालाचे पडलेले दर सध्या वाढू लागले आहेत. तापमानात वाढ होऊ लागल्याने द्राक्षांची गोडी वाढू लागली आहे. त्यामुळे बाजारपेठेत द्राक्ष मालाची मागणी वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. मात्र, उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे.

द्राक्ष पंढरी असलेल्या तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गव्हाण, अंजनी, सावळज, वडगाव, डोंगरसोनी, मणेराजुरी परिसरात द्राक्ष हंगाम सध्या जोमाने सुरू आहे. सुरुवातीच्या काळात कमी पर्जन्यमानामुळे पाणीटंचाई होऊन पीक छाटणीला अडचण निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर विविध पाणी योजनेतून पाणी सोडल्याने द्राक्ष पिकाला दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला होता. सुमारे दीड लाख टन मालाचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती.

शेतकरी अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जात असताना द्राक्षमाल दरात घसरण झाली होती. द्राक्ष माल व्यापाऱ्यांनी ज्यादा दराच्या अपेक्षेने कमी गोडीचा माल विक्रीसाठी बाजारपेठेत पाठविला; पण आगाप द्राक्ष मालात गोडवा कमी असल्याने आंबट द्राक्षांमुळे हंगामाच्या सुरुवातीलाच दर पडले होते.

व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या ज्यादा दराच्या अपेक्षेचा परिणाम हंगामात काही दिवस दिसून आला. त्यामुळे द्राक्ष माल दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. घसरलेल्या दरामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाल होता. कमी दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल होते.

मागील पंधरवड्यात चार किलोच्या द्राक्षपेटीला १०० ते १५० रुपये दर होता. मात्र, द्राक्ष मालाची गोडी वाढल्याने सध्या द्राक्षाच्या पेटील सरासरी १५० ते २२० रुपये दर मिळत आहे. चांगल्या मालाला चांगलाच दर मिळत आहे. निर्यातक्षम द्राक्षांना प्रति किलो ८० ते १०५ रुपये दर मिळत आहे. तरीही दरात सातत्य नसल्याने शेतकरी नाराज आहेत.

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डशेतकरीसांगलीतासगाव-कवठेमहांकाळ