Join us

Mango Export पॅलेस्टियन समुद्री चाच्यांनी समुद्रावर कब्जा मिळवल्यामुळे समुद्रमार्गे होणारी आंबा निर्यात ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 3:40 PM

हवामान आणि किडींच्या फेऱ्यातून वाचलेला हापूस आता बाजारावर आपली मोहोर उमटवत असताना रशिया-युक्रेन आणि पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाचा परिणाम आता हापूसच्या निर्यातीवर झाला आहे.

रत्नागिरी: सतत बदलते हवामान आणि कीडरोगांचा त्रास सहन केलेल्या हापूसमागचे दुष्टचक्र अजूनही संपायचे नाव घेत नाही. हवामान आणि किडींच्या फेऱ्यातून वाचलेला हापूस आता बाजारावर आपली मोहोर उमटवत असताना रशिया-युक्रेन आणि पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाचा परिणाम आता हापूसच्या निर्यातीवर झाला आहे.

युद्धामुळे हापूसचा समुद्रमार्गे प्रवास अडचणीचा झाला आहे. आतापर्यंत वाशी येथून ९८६ टन आंबा निर्यात झाली आहे; मात्र पुढील निर्यातीला ब्रेक लागला असल्याची माहिती कृषी पणन मंडळातर्फे देण्यात आली. परदेशात आंब्याला मागणी व दर असूनही निर्यात थांबल्यामुळे बागायदार व निर्यातदारांचे नुकसान होत आहे.

मुंबईतील वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकीरण सुविधा केंद्रातून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ९८६ टन आंबा निर्यात झाला आहे. यात सर्वाधिक ८२५ टन आंबा अमेरिकेत निर्यात झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये १५ टन, न्यूझीलंड ९९, जपानमध्ये ३५, तर युरोपमध्ये १२ टन आंबा निर्यात झाला आहे.

अन्य देशांत कमी प्रमाणात आंबा निर्यात झाला आहे. यामध्ये कोकणातील हापूसचे प्रमाण ३५ टक्के आहे. गेली काही वर्षे हापूसमागचे दुष्टचक्र सुरूच आहे. अनेक समस्या झेलूनही यावर्षी हापूसचे उत्पादन चांगले आले आहे. मात्र, निर्यातीला पोषक वातावरण नसल्यामुळे निर्यात रोडावलेली आहे.

४० पेक्षा अधिक लोक आंबा निर्यात करतात. निर्यात करणाऱ्या आंब्यांचे बुकिंग आधी करून ठेवलेले असते. हंगाम सुरू झाल्यानंतर निर्यात केंद्रातील विकीरण केंद्रात प्रक्रिया करून निर्यात होते. एकावेळी १२०० किलोंची एक बॅच म्हणजेचे ४०८ बॉक्सचे एकत्रित बुकिंग मिळाले तर विमानातून अथवा जहाजातून ते पाठवले जातात.

मात्र, पॅलेस्टियन समुद्री चाच्यांनी समुद्रावर कब्जा मिळवल्यामुळे समुद्रमार्गे होणारी निर्यात ठप्प झाली आहे. यावर्षी तब्बल २५ वेळा समुद्रमार्गे निर्यातीची संधी होती. मात्र, केवळ युद्धामुळे ती संधी गेली आहे. सध्या मॉरिशस, रशिया, मलेशिया या देशांतील निर्यात पूर्णपणे बंद आहे. सागरी मार्गे वाहतूक बंद असतानाच विमान वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे.

यावर्षी पाच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट होते; परंतु अवघे ९८६ टन आंबा निर्यात झाला आहे. दि. ३० जूनपर्यंत हंगाम सुरू असतो. त्यामुळे दोन हजार मेट्रिक टन आंबा निर्यात होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक येथील लासलगाव येथील निर्यात केंद्रातून ३५० टन, तर रत्नागिरी केंद्रातून अत्यल्प निर्यात झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ९८६ टन आंबा निर्यात३५% कोकणातून हापूस निर्यातअमेरिका ८२५न्यूझीलंड  ९९जापान ३५ ऑस्ट्रेलिया १५ युरोप १२

यावर्षी कीडरोगाचा प्रादुर्भाव होऊनही आंबा पीक वाचविण्यात यश आले. त्यामुळे आंबा उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे; परंतु उत्पादनाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळाला नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. रशिया- युक्रेन आणि पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धामुळे परदेशी निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दरही गडगडले आहेत. बागायतदारांचे आता दुहेरी नुकसान होत आहे. - राजन कदम, आंबा बागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :आंबासागरी महामार्गशेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रणकोकणयुद्धयुक्रेन आणि रशियाइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष