Join us
Daily Top 2Weekly Top 5

आवक कमी त्यात लग्नसराईच्या वाढीव मागणीचा परिणाम; शेवग्याच्या शेंगांना एक लिटर पेट्रोलचा दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 15:01 IST

आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगांनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भाव खाल्ला आहे. भाजीबाजारामध्ये शेवग्याच्या शेंगा ३० ते ३५ रुपये पाव दराने विकल्या जात असून १ लिटर पेट्रोल एवढा दर आहे.

आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगांनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भाव खाल्ला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे बाजारपेठेत शेवग्याची आवक निम्म्यावर आली असताना, दुसरीकडे लग्नसराई आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमुळे मागणी प्रचंड वाढली आहे.

परिणामी, भाजीबाजारामध्ये शेवग्याच्या शेंगा ३० ते ३५ रुपये पाव दराने विकल्या जात असून १ लिटर पेट्रोल एवढा दर आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत शेवग्याच्या शेंगांचे दर आवाक्यात होते. मात्र, मार्च महिना सुरू होताच तापमानात वाढ झाली आणि त्याचा फटका शेवग्याच्या उत्पादनाला बसला आहे.

अनेक भागांत पाण्याची कमतरता भासू लागल्याने झाडांच्या शेंगा कमी झाल्या आहेत.  दुसरीकडे कार्यक्रमांमध्ये विविध पदार्थ बनविण्यासाठी शेवग्याच्या शेगांचा उपयोग केला जातो. सध्याचे दर पाहता मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या ताटातून शेवगा गायब होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला वाव मिळत आहे.

इतरही भाजीपाला महागला

• गडचिरोली जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढताच त्याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर दिसून येत आहे. केवळ शेवग्याच्या शेंगाच नाही, तर आता टोमॅटो, भेंडी, गवार आणि पालेभाज्यांचे दरही कडाडले आहेत.

• गडचिरोलीच्या भाजीबाजारात आवक घटल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले असून, सर्वसामान्यांच्या ताटातून भाजी गायब होण्याची वेळ आली आहे. सामुहिक भोजनावळीतही महागडा भाजीपाला दिसून येत नाही.

गावाकडच्या शेवग्याची आवक सध्या खूपच कमी झाली आहे. बाहेरून येणारा माल महाग पडत असून वाहतूक खर्चही वाढला आहे. घाऊक बाजारातच दर वाढल्याने आम्हाला किरकोळ विक्रीत ३० रुपये पाव दराने शेंगा विकण्याशिवाय पर्याय नाही. - विनायक ठाकरे, भाजीपाला विक्रेता, गडचिरोली.

औषधी गुणांची खाण

शेवग्याच्या शेंगा केवळ चवीसाठीच नाही तर उत्तम आरोग्यासाठीही ओळखल्या जातात. दुधापेक्षाही अधिक कॅल्शियम यात असल्याने हाडांच्या मजबुतीसाठी शेवगा अत्यंत उपयुक्त आहे.

पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि डिझेलची झळ

• भाजीपाला महागण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. पहिले म्हणजे सिंचनासाठी पाण्याची पातळी खालावल्याने शेतकऱ्यांचे पीक करपून जात आहे.

• दुसरे म्हणजे, बाहेरील जिल्ह्यांतून भाजीपाला वाहतूक करताना इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे.

• घाऊक बाजारातच आम्हाला चढ्या दराने माल खरेदी करावा लागत आहे, त्यात उन्हामुळे भाजी खराब होऊन होणारे नुकसान पाहता किरकोळ दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही. असे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा

English
हिंदी सारांश
Web Title : Drumstick price soars to petrol rate due to low supply.

Web Summary : Drumstick prices skyrocket due to low supply from heat and high wedding season demand. Other vegetables also become costly in Gadchiroli due to water scarcity and transportation costs, impacting consumers.
टॅग्स :भाज्याबाजारशेतकरीशेतीशेती क्षेत्र