Join us
Daily Top 2Weekly Top 5

Wheat Market : अवकाळी पावसाचा गव्हाला मोठा फटका; बाजारात रंगहीन गव्हाची आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:22 IST

Wheat Market : फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका आता गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी अडत बाजारात सध्या तब्बल ६० ते ७० टक्के रंगहीन गव्हाची आवक होत असून, या गव्हाला कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.(Wheat Market)

छत्रपती संभाजीनगर : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका आता गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. (Wheat Market)

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात रंगहीन गव्हाची आवक होत असून, एकूण आवकीपैकी तब्बल ६० ते ७० टक्के गहू पांढरट रंगाचा येत आहे. (Wheat Market)

यामुळे गव्हाच्या दरात घसरण झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.(Wheat Market)

यंदा जिल्ह्यात गव्हाचे उत्पादन चांगले झाले असले तरी अवकाळी पावसामुळे गव्हाचा नैसर्गिक गव्हाळ रंग खराब झाला.(Wheat Market)

परिणामी अनेक ठिकाणी गहू पांढरट दिसू लागला आहे. बाजारात अशा रंगहीन गव्हाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

५० किलोमीटर परिसरातून गव्हाची आवक

जाधववाडी अडत बाजारात शहराच्या आसपासच्या जवळपास ५० किलोमीटर परिसरातील गावांतून मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत आहे.

सध्या चांगल्या प्रतीच्या गव्हाळ गव्हाला २,६०० ते २,९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मात्र, रंगहीन गहू फक्त २,१५० ते २,२२५ रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे.

दरातील हा मोठा फरक शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरत असून, उत्पादन जास्त असूनही अपेक्षित नफा मिळत नसल्याचे चित्र आहे.

ग्राहक रंगहीन गव्हाकडे पाठ फिरवताहेत

अवकाळी पावसामुळे गव्हाचा रंग फिक्का पडला आहे. ग्राहक बाजारात गव्हाचा रंग पाहूनच खरेदी करत असल्याने पांढरट गव्हाला कमी मागणी आहे.

घरगुती वापरासाठी ग्राहक अधिक पैसे मोजून चांगल्या रंगाचा गहू खरेदी करत आहेत.

अडत बाजारात येणारा रंगहीन गहू पाहिल्यानंतर तो वाळूच्या ढिगासारखा भासत असल्याची प्रतिक्रिया अनेक ग्राहक व्यक्त करत आहेत.

फ्लोअर मिलसाठी मात्र वाढली मागणी

पावसामुळे गव्हाचा रंग खराब झाला असला तरी तो खाण्यासाठी वाईट नसतो. फ्लोअर मिल चालक मोठ्या प्रमाणात हा गहू खरेदी करत आहेत. या गव्हापासून रवा, मैदा, आटा आणि तंदूर आटा तयार केला जातो. दररोज ४० ते ५० टन गहू मिलवाल्यांकडे जात आहे.- हरीश पवार, अडत व्यापारी

उन्हाळी बाजरीची आवक वाढली

अडत बाजारात उन्हाळी बाजरीची आवकही सुरू झाली आहे. मागील आठ दिवसांपासून दररोज २०० ते २५० पोत्यांची आवक होत आहे.

गेल्या वर्षी २,७०० ते २,८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाणारी बाजरी यंदा सुरुवातीला २,००० ते २,४०० रुपये दराने विकली जात आहे.

ज्वारीच्या दरातही घसरण

गतवर्षी उत्पादन कमी झाल्याने ज्वारीला ३,००० ते ४,४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र यंदा उत्पादन वाढल्याने ज्वारीचे भाव घसरले असून सध्या २,००० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. कर्नाटकातून येणारी ज्वारी २,५०० ते ३,००० रुपये दराने विकली जात आहे.

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारातील गव्हाची आवक कमी झाली आहे. मागील महिन्यात दररोज हजार पोत्यांपेक्षा जास्त गहू येत होता, मात्र आता ही आवक ३०० ते ४०० पोत्यांपर्यंत घटली आहे.- संजय पहाडे, अडत व्यापारी

हे ही वाचा सविस्तर : Farmer Protest : शेतकऱ्यांचा संघर्ष यशस्वी; 'पॉवर ग्रीड'कडून मिळणार नुकसानभरपाई

अधिक वाचा : Soybean Market Update : दर वाढले पण माल संपला; सोयाबीन बाजारात नेमकं काय घडलं?

English
हिंदी सारांश
Web Title : Untimely Rains Cause Discoloration; Wheat Prices Drop in Market

Web Summary : Untimely rains have discolored 70% of wheat in the market, impacting farmers. Lighter wheat fetches lower prices. Despite high production, farmers face losses as consumers prefer richer colored grains for household use. Flour mills are processing the discolored wheat.
टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती