लासलगाव : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम देशातील कांदा निर्यातीवर होत असून आखाती देशांमध्ये होणारी कांद्याची निर्यात सुमारे ४५ टक्क्यांनी घटल्याची माहिती समोर आली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे कंटेनर वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने निर्यात मंदावली असताना कांदा निर्यातदारांनी मार्च २०२६ मध्ये अंदाजे ३५० कंटेनरद्वारे आखाती देशांमध्ये कांद्याची निर्यात केली.
मात्र, मार्च २०२५ मध्ये हीच निर्यात सुमारे ६०० कंटेनरपर्यंत झाली होती. एकूण जागतिक स्तरावरही कांदा निर्यात सुमारे ३५ टक्क्यांनी घटल्याची माहिती कृषीमाल निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकाससिंग यांनी सांगितले. कांदा निर्यात घटल्याचा थेट परिणाम लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याच्या दरावर दिसून आला.
मार्च २०२६ मध्ये उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त १५०० रुपये प्रति क्विंटल तर लाल कांद्याला १४१७ रुपये दर मिळाला. मार्च २०२५ मध्ये उन्हाळी कांद्याला २६२७ रुपये आणि लाल कांद्याला ३१०१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाले होते. कांदा दरातील मोठ्या घसरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
दहापट भाडेवाढकंटेनर वाहतुकीच्या भाड्यात तब्बल दहापट वाढ झाली आहे. पूर्वी आखाती देशांसाठी कंटेनरचे भाडे ६०० ते ७०० डॉलर दरम्यान होते. आता सुमारे ६५०० डॉलरपर्यंत पोहोचल्याने निर्यात खर्चिक बनली आहे. कमी दरात कांदा आखाती बाजारात पोहोचत असल्याने भारतीय कांद्याच्या मागणीत घट झाली आहे.
केंद्र सरकारने कंटेनर भाडेवाढ नियंत्रणात आणावी. कांदा निर्यातीसाठी किमान १० टक्के सबसिडी द्यावी, अशी मागणी कांदा निर्यातदार व्यापारी, लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक प्रवीण कदम यांनी केली आहे.
लासलगावसह जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच युद्धामुळे निर्यात घटली आहे. देशांतर्गत वाहतुकीसाठी रेल्वे मालगाड्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी रेल्वे विभागाशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परदेशात कांदा निर्यात वाढवण्यासाठी लासलगाव बाजार समितीच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे.
कांद्याच्या सध्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्चही निघत नाही. मुलांचे शिक्षण, घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने आखाती देशांसह नवीन बाजारपेठ शोधून कांदा निर्यात वाढवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.- निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक