Tur Market Update : मागील वर्षी ११ हजारांचा दर गाठणाऱ्या तुरीचे यंदा मात्र निराशा केली आहे. तीन महिने प्रतीक्षा करूनही अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, त्यांना तुरीची विक्री कमी दरात करावी लागत आहे. (Tur Market)
बुलढाणा जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही तुरीला समाधानकारक भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही आशा आता धूसर होत चालली असून मागील चार दिवसांपासून तुरीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. (Tur Market)
अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेवर तूर साठवून ठेवली होती. मात्र, आता खरीप पेरणी तोंडावर आल्याने बी-बियाण्यांसाठी पैसे उभारण्यासाठी त्यांना नाइलाजाने कमी भावाने तूर विकावी लागत आहे.
शेतमालाला योग्य दर मिळावा, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आता जास्त काळ अनुत्तरित राहू नये. उत्पादनात घट असूनही दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम होत आहे. शासन आणि बाजार यंत्रणेने स्थिर व शाश्वत बाजारभाव निश्चित करण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. (Tur Market)
गतवर्षीचा उच्चांकी दर आणि यंदाची निराशा
मागील वर्षी तूर ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकली गेली होती. यंदा मात्र, सरासरी भाव ७ हजारांच्या खाली पोहोचला आहे. विशेष म्हणजे यावर्षी तुरीचे उत्पादनही कमी झाले होते. त्यानुसार भाव वाढेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. यंदाच्या वर्षी सततच्या घसरणीमुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भुईमूगाने केले हताश
जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत जामोद आणि आसलगाव या उपबाजारांमध्ये सध्या उन्हाळी भुईमूग विक्रीसाठी येत आहे. येथे सरासरी भाव सुमारे ५ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे. किमान ५ हजार तर कमाल ५ हजार ८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. या दरामुळे भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांमध्येही निराशा पसरली आहे.
पेरणीपूर्व खर्चासाठी तातडीची विक्री
तूर विक्रीचा निर्णय अनेक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या तोट्याचा ठरत आहे. पेरणीच्या तयारीसाठी पैसा उभारावा लागतो, म्हणून तुरीची विक्री केली; पण हंगामात अपेक्षेप्रमाणे दर न मिळाल्याने आर्थिक फटका बसला. - श्रीकृष्ण जाधव, शेतकरी.
असा मिळाला तुरीला सरासरी भाव
दिनांक | सरासरी भाव (रु./क्विंटल) |
१० मे | ६,८३० |
१३ मे | ६,७६२ |
१५ मे | ६,७०० |
१७ मे | ६,६३८ |
हे ही वाचा सविस्तर : Wheat Market : गहू दर अपडेट: तुमच्या बाजारात काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर