Join us

तापमान वाढलं, नारळ पाणी पिण्यास पसंती, बाजारात शहाळे काय भाव? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 2:16 PM

केवळ तहान भागविण्यासाठी नाही, तर आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या नारळ खरेदीकडे नागरिकांचा कल आहे.

वाढत्या उन्हामुळे पारा 40 अंश सेल्सिअस पार गेला आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने फळांनाही मागणी वाढली आहे. शितपेयाबरोबरच शहाळ्याला देखील मागणी वाढली असून किरकोळ बाजारात साधारण 50 ते 60 रुपयांना विक्री केली जात आहे. त्यामुळे केवळ तहान भागविण्यासाठी नाही, तर आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या नारळ खरेदीकडे नागरिकांचा कल आहे.

दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उन्हामुळे जीवाची लाही लाही होत आहे. अशात शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी शितपेयांना मागणी वाढली आहे. मात्र बहुतांश नागरिक नारळ पाण्याला पसंती देत आहेत. भरदुपारी रस्त्याने फिरताना नागरिक रसवंती, निरा, ज्यूस प्यायला गर्दी करताना दिसत आहेत. तर अनेकजण आजारपणाला आमंत्रण नको म्हणून नारळ पाणी पिण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे बाहेरील शीतपेय पिण्यापेक्षा नागरिक नारळ खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे नारळ विक्रेत्यांकडेही नारळाचा ढीग पाहायला मिळत आहे. 

आरोग्याला फायदा

केवळ तहान भागविण्यासाठी नाही, तर आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या नारळ खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. नारळ पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, अमिनो अॅसिड, एंझाईम्स हे आरोग्याला फायदेशीर असे घटक आढळतात. 

कसा मिळतोय बाजारभाव

आजच्या बाजारभावानुसार नाशिक बाजार समिती शहाळ्यास क्विंटल मागे कमीत कमी 2800 रुपये तर सरासरी 3200 रुपयांचा दर मिळाला. पुणे बाजारात कमीत कमी तीनशे रुपये तर सरासरी 600 रुपये दर मिळाला कालचा बाजारभाव पाहिला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 36000 नगांची आवक झाली होती. यात क्विंटलला सरासरी 2600 रुपये दर मिळाला. म्हणजेच घाऊक बाजारात साधारण एक नग 35 ते 40 रुपयांना विक्री होत आहे. तर किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपयांना विक्री केली जात आहे.

टॅग्स :शेतीतापमानपाणीशेती क्षेत्रमार्केट यार्ड