Join us

Tomato Market : मागील हफ्त्यात टोमॅटो कॅरेटला सातशे रुपयाचा भाव, आज तीनशे रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 14:25 IST

Tomato Market : मागील आठवड्यात ७०० ते ८०० रुपये क्रेटप्रमाणे विकले जाणारे टोमॅटो तीनशे रुपयाच्या आत आल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

नाशिक : शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळे पिके घेण्याचा प्रयत्न करत असतो. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाकडे मोर्चा वळवला, कोबी, मिरची, टोमॅटोची लागवड (Tomato farming) केली. मागील आठवड्यात ७०० ते ८०० रुपये क्रेटप्रमाणे विकले जाणारे टोमॅटो तीनशे रुपयाच्या आत आल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

येवला तालुक्यासह जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकातील नुकसान भरून काढण्यासाठी टोमॅटोची लागवड केली. मशागतीपासून ते तोडणीपर्यंत मोठा खर्चही केला. यामुळे लागवड क्षेत्र टोमॅटोच्या लालीने बहरून गेले. टोमॅटोची तोडणी केली; मात्र हा टोमॅटो बाजारात विक्रीसाठी दाखल होताच शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. 

कष्ट करून पिकविलेल्या टोमॅटोला पंधरा रुपये, प्रतिकिलो एवढा भाव मिळत आहे. आज २० किलो क्रेटला ३०० रुपयांचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सध्या एकाच वेळेस टोमॅटो आल्याने बऱ्यापैकी आवक होत आहे. त्याचा परिणामही बाजारभावावर होत आहे. 

वाहतूक, मजुरी, औषधे, तोडणीचा खर्चसध्या टोमॅटोला ३०० रुपयांच्या आसपास क्रेटला दर मिळत आहे. परंतु एक क्रेट तोडण्यासाठी वीस रुपये, तर भाडे ३० रुपये असा खर्च तसेच लिक्विड खते, औषधे, मजुरी हा खर्च मोठ्या प्रमाणात होत असून, शेतकऱ्यांना आज पंधरा रुपये किलोप्रमाणे भाव मिळत असला तरी खर्चाचा आणि भावाचा ताळमेळ बसताना दिसत नाही.

दोन एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली, एक लाखाच्या आसपास खर्च झालेला आहे, टोमॅटोला मागील हप्त्यात सातशे रुपये दर मिळाला तो आता तीनशे रुपये क्रेटप्रमाणे मिळत आहे, या दरामध्ये शेतकऱ्यांचा पाहिजे असा नफा मिळत नाही.- अर्जुन सोनवणे, टोमॅटो उत्पादक

टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डशेतीनाशिकशेती क्षेत्र