Soybean Market Update : दिवाळीनंतर सोयाबीनला मिळणाऱ्या वाढीव भावामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सोमवारी (१० नोव्हेंबर) वाशिम बाजार समितीसमोर शेतकऱ्यांच्या वाहनांची रांग लागली होती. (Soybean Market Update)
दिवाळीनंतर वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी धडाका लावल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांवर कामाचा ताण वाढला आहे. पुसद नाका ते हिंगोली नाका या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली, तर काही रुग्णवाहिकाही या वाहतूक कोंडीत अडकल्या. (Soybean Market Update)
सोशल मीडियावर वाशिम बाजार समितीत 'सोयाबीनला ८ हजार रुपयांपर्यंत दर मिळतोय' असा दावा करणाऱ्या पावत्या व्हायरल झाल्याने जिल्ह्यासह यवतमाळ, हिंगोली आणि बुलढाणा येथील शेतकरी वाशिमकडे ओढले गेले. बाजार समिती 'ओव्हरलोड' झाल्याने प्रवेशद्वार बंद ठेवावे लागले आणि वाहनांच्या लांबलचक रांगा बाजार परिसराच्या बाहेरपर्यंत दिसून आल्या.(Soybean Market Update)
बाजार समिती प्रशासन हतबल!
सोयाबीनची आवक अत्यंत वेगाने वाढत असून उपलब्ध जागा कमी पडत आहे. माल मोजणी आणि आवक नियंत्रण सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले आहे. - वामनराव सोळंके, सचिव, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती
कारंजा बाजार समितीतही विक्रमी आवक
वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीतही सोमवारी विक्रमी ३० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. मागील तीन दिवसांत या ठिकाणी एकूण ५७ हजार क्विंटलपेक्षा जास्त माल आला आहे.
सोयाबीनची काढणी पूर्ण झाल्यानंतर रब्बी हंगामासाठी पैशांची गरज भासल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी धडाका लावला आहे.
भावात सुधारणा
कारंजा बाजार समितीत सोमवारी मिल क्वॉलिटी सोयाबीनला ४ हजार ५०५ रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला, जो जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत अधिक आहे. तथापि, बाजार तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना बाजारभावाचा कल पाहूनच विक्रीचा निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे.
खरेदी व्यवहार तात्पुरते बंद!
आवक वाढल्यामुळे बाजार समितीत जागेची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे कारंजा बाजार समितीने ११ नोव्हेंबरपासून पुढील आदेशापर्यंत शेतमाल खरेदीचे व्यवहार तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
