वाशिम : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मागील तीन महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत असले तरी एप्रिल महिन्यात दरांनी जोरदार उसळी घेतली आहे.(Soybean Market)
हंगामाच्या सुरुवातीला दबावात असलेले दर आता सावरले असून, अनेक ठिकाणी ६,००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.(Soybean Market)
विशेष म्हणजे कारंजा बाजार समितीत सोयाबीनला कमाल ६,२३० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरुवातीला दर घसरले, नंतर घेतली झेप
हंगामाच्या सुरुवातीला बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे सोयाबीनचे दर ५,२०० ते ५,५०० रुपयांदरम्यान घसरले होते. आर्थिक गरजेमुळे अनेक शेतकऱ्यांनी याच कमी दरात विक्री केली.
मात्र, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आवक कमी होऊ लागली आणि तेलाच्या वाढत्या मागणीमुळे दरात सुधारणा दिसू लागली. मार्चमध्ये दर ५,५००० ते ५,७०० रुपयांपर्यंत पोहोचले.
एप्रिलमध्ये दरवाढीला वेग
एप्रिल महिन्यात सोयाबीन दरात अधिक वेगाने वाढ झाली. जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये दर ६,००० ते ६,२०० रुपयांदरम्यान नोंदवले जात आहेत.
कारंजा बाजार समितीत मिळालेला ६,२३० रुपयांचा दर हा या हंगामातील उच्चांक ठरला आहे.
साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा
ज्या शेतकऱ्यांनी काढणीनंतर घाई न करता सोयाबीन साठवून ठेवले, त्यांना आता या वाढीव दराचा मोठा फायदा होत आहे.
वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारी ठरत आहे.
मागणी वाढली, आवक स्थिर
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दररोज सरासरी सुमारे १२ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
आवकेत विशेष वाढ नसली तरी तेल गिरण्या आणि प्रक्रिया उद्योगांकडून मागणी सातत्याने वाढत असल्याने बाजारात तेजी कायम आहे. व्यापाऱ्यांमध्ये खरेदीसाठी स्पर्धा दिसून येत आहे.
अनेक शेतकऱ्यांकडे माल संपला
अनेक शेतकऱ्यांनी आधीच विक्री केल्यामुळे त्यांच्या घरात सध्या सोयाबीन शिल्लक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाढलेल्या दराचा लाभ सर्वांना घेता आलेला नाही.
पुढील दरवाढीची शक्यता
बाजारतज्ज्ञांच्या मते, जर बाजारातील आवक मर्यादित राहिली आणि मागणी कायम राहिली, तर पुढील काही आठवड्यांत सोयाबीनचे दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या थांबा आणि पाहा या भूमिकेत असून, अधिक दराच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकऱ्यांसाठी काय संकेत?
सध्याची दरवाढ शेतकऱ्यांसाठी सकारात्मक असली तरी बाजारातील चढ-उतार लक्षात घेऊन योग्य वेळी विक्री करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. आगामी काळात मागणी-पुरवठा यावरच दरांची दिशा अवलंबून राहणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीनने घेतली झेप; ६ हजार पार दर, अजून वाढणार का?
अधिक वाचा : soybean cotton rate : सोयाबीन-कापसाला जबरदस्त उठाव; दर पुन्हा वधारले
Web Summary : Soybean prices fluctuated since February, peaking at ₹6,230/quintal in April in Karanja. Increased oil demand and steady market arrivals fuel the price rise, benefiting farmers who stored their produce.
Web Summary : फरवरी से सोयाबीन की कीमतों में उतार-चढ़ाव आया, करंजा में अप्रैल में 6,230 रुपये प्रति क्विंटल पर पहुंच गया। तेल की बढ़ती मांग और स्थिर बाजार आवक से कीमतों में वृद्धि हुई, जिससे किसानों को लाभ हुआ जिन्होंने अपना उत्पाद संग्रहीत किया।