Join us

Shetmal : शेतमालाची नासाडी आणि बाजार समित्यांमधील व्यवस्थापनाचे आव्हान वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 09:56 IST

Shetmal : भारतातील कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकवलेला शेतमाल (Shetmal) बाजारात पोहोचेपर्यंत अनेक टप्प्यांतून जातो. मात्र या प्रवासात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य, फळे, भाजीपाला यांची नासाडी होते. या लेखात आपण भारतातील शेतमालाच्या नासाडीचे प्रमाण, त्यामागची कारणे, परिणाम आणि त्यावर उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. (Shetmal)

Shetmal : भारतातील कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकवलेला शेतमाल (Shetmal) बाजारात पोहोचेपर्यंत अनेक टप्प्यांतून जातो. मात्र या प्रवासात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य, फळे, भाजीपाला यांची नासाडी होते. (Shetmal)

दरवर्षी लाखो कोटी रुपयांचा शेतमाल (Shetmal) वाहतुकीत, साठवणुकीत किंवा बाजार समित्यांमध्ये योग्य व्यवस्थेअभावी वाया जातो. या समस्येकडे वेळेवर लक्ष न दिल्यास अन्न सुरक्षा, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शेतमाल (Shetmal) नासाडी टाळण्यासाठी विशेष अभ्यास गटाची स्थापना केली आहे. या लेखात आपण भारतातील शेतमालाच्या नासाडीचे प्रमाण, त्यामागची कारणे, परिणाम आणि त्यावर उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

 बाजार समित्यांमधील व्यवस्थापनाचे आव्हान

भारतातील कृषी क्षेत्र हे अजूनही मोठ्या प्रमाणावर हवामान, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि वितरणातील अकार्यक्षमता यांवर अवलंबून आहे. देशातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शेतमालाची नासाडी होत असल्याचे विदारक वास्तव विविध अहवालांमधून समोर आले आहे. ही नासाडी केवळ आर्थिकच नाही, तर पर्यावरणीय आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही गंभीर स्वरूपाची आहे.

देशव्यापी शेतमाल नासाडी; आकडेवारीचे वास्तव

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशभरातील बाजार समित्या आणि वाहतूक व्यवस्थेमुळे दरवर्षी सुमारे १.५३ लाख कोटी रुपये मूल्याचे अन्नधान्य, फळे व भाजीपाला वाया जातात. विशेषतः नाशवंत पिकांच्या वाहतुकीदरम्यान ५ ते १० टक्के नुकसान होत असल्याचे नाबार्डच्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

विकसनशील देशांमध्ये ही परिस्थिती अधिक बिकट आहे. भारतासह अन्य गरीब देशांमध्ये बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आलेल्या फळे व भाजीपाल्यांची ३० ते ४० टक्के आणि अन्नधान्याची सुमारे १० टक्के नासाडी होते.

एफएओचा हस्तक्षेप आणि अभ्यास गटाची निर्मिती

ही गंभीर समस्या लक्षात घेता, संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना (FAO) यांनी नुकतीच 'फूड लॉस ॲण्ड वेस्ट मॅनेजमेंट ऑफ होलसेल मार्केट्स ऑफ इंडिया' हा अभ्यास प्रकल्प सुरू केला आहे.

बँकॉकच्या एफएओ प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी मिता पंजाबी यांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यास गट कार्यरत आहे.

या अभ्यास गटात कार्यकारी समन्वयक म्हणून जे. एम. यादव (कोसाम), अन्न शास्त्रज्ञ डॉ. रावसाहेब मोहिते, हवामान आणि पर्यावरण तज्ज्ञ भरत नागर आणि माझा सदस्य म्हणून समावेश केला आहे. आम्ही या समस्येवर प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे काम करणार आहोत.

शेतमाल नासाडीमुळे होणारे बहुआयामी नुकसान

शेतमालाच्या नासाडीमुळे अनेक स्तरांवर परिणाम होत आहेत

* ग्राहकांसाठी महागाई : माल उपलब्ध न झाल्याने बाजारात किंमती वाढतात.

* शेतकऱ्यांच्या संसाधनांचा अपव्यय : जमीन, पाणी, खत, कीटकनाशके, मनुष्यबळ आणि भांडवल यांचा अपुरे उत्पादन मिळाल्यामुळे अपव्यय होतो.

* पर्यावरणीय हानी : कुजलेला शेतमाल कचरा स्वरूपात जमा होऊन मिथेन वायूचे उत्सर्जन करतो, जो हवामान बदलासाठी अत्यंत घातक आहे.

प्रमुख पिकांचे नुकसान

शेतमालाचा प्रकार    अंदाजे नुकसान (कोटी रु.)
तांदूळ, गहू, मका   २६,०००
डाळी व तेलबिया   १८,०००
फळे व भाजीपाला   ५७,०००

विशेषतः आंबा (१० हजार ५८१ कोटी), केळी (५ हजार ७७७ कोटी) आणि लिंबूवर्गीय फळे (४ हजार ३४७ कोटी) यांचे सर्वाधिक नुकसान होते. त्याचप्रमाणे कांदा (५ हजार १५६ कोटी) आणि टोमॅटो (५ हजार ९२१ कोटी) यांचीही नासाडी चिंतेचा विषय आहे.

पायाभूत सुविधांचा अभाव

शेतमालाच्या नासाडीमागील मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत

* योग्य थंड साठवणूक सुविधांचा अभाव

* वाहतुकीसाठी अपुरी आणि जुनी साधने

* अकार्यक्षम पुरवठा साखळी

* कापणीनंतर शेतमाल हाताळणीतील अडथळे

मुंबई आणि पुणे बाजार समित्यांतील परिस्थिती

* मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज २०० टन शेतमाल वाया जातो, तर पुणे बाजार समितीत दररोज ५० ते ६० टन भाजीपाला, फळे, फुले, धान्यांची नासाडी होऊन ५० ते ६० टन कचरा निर्माण होतो.

* या कचऱ्यातून दर १०-१५ टनांमागे एक टन मिथेन वायू तयार होतो, जो २३ टन कार्बन डायऑक्साईड इतका घातक आहे. त्यामुळे ही नासाडी हवामान बदलाला गती देत आहे.

* मिथेन वायू हवेतील उष्णता शोषून घेत असल्यामुळे तापमान वाढीला कारणीभूत ठरतो. त्यामुळे जगभरात मिथेन वायूचे उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी कृषी कचऱ्यापासून सेंद्रिय खत, बायोगॅस निर्मितीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

सकारात्मक उपाययोजना अन् पुढील दिशा

* थंड साखळी (कोल्ड चेन) यंत्रणांचा विस्तार : थेट शेतापासून बाजारात व वितरणापर्यंत.

* आधुनिक वाहतूक व साठवणूक सुविधा : फळभाजीपाला नाश होऊ नये यासाठी.

* शेतकऱ्यांना प्रशिक्षण : कापणीनंतरची योग्य हाताळणी, ग्रेडिंग व पॅकिंगविषयी.

कृषी कचऱ्याचे व्यवस्थापन : बायोगॅस आणि सेंद्रिय खत निर्मितीसाठी.

द्वितीय श्रेणी मालासाठी प्रक्रिया उद्योगांचे प्रोत्साहन : जसे की जॅम, सॉस, लोणची निर्मिती.

शेतमालाची नासाडी ही भारतासारख्या अन्न सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील देशासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. यातून आर्थिक नुकसान तर होतेच, परंतु पर्यावरणीय संकटही गडद होते. म्हणूनच एफएओच्या माध्यमातून सुरू झालेल्या अभ्यास गटाच्या निष्कर्षांनुसार, सरकार व बाजार समित्यांनी ठोस पावले उचलली पाहिजेत.या प्रयत्नांतूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येईल आणि ग्राहकांनाही परवडणाऱ्या दरात अन्नधान्य उपलब्ध होईल.

- डॉ. परशराम पाटील,सदस्य, अभ्यास गट (एफएओ),शेतमाल नासाडी प्रतिबंधक उपाययोजना समिती

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती