Join us

Onion Issue : कांद्याचा तिढा, शेतकऱ्याचे मरण, बाजार समिती प्रशासनाची भूमिका महत्वाची, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 1:40 PM

स्थानिक बाजार समिती प्रशासनाने कांद्याचा तिढा सोडविण्याची गरज असल्याचा सूर उमटू लागला आहे. 

एकीकडे आठ दिवसांच्या लिलाव बंदनंतर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरु झाले. मात्र अद्यापही लेव्हीचा प्रश्न सुटला नसून काही निवडक बाजार समित्या वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून स्थानिक बाजार समिती प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा तिढा सोडविण्याची गरज असल्याचा सूर उमटू लागला आहे. 

सध्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांदा काढणीची लगबग सुरू असून  शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. परंतु, लेव्हीच्या मुद्यावरून व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या खरेदी-विक्रीत सहभागी न होण्याची भूमिका घेवून गेल्या पंधरा दिवसांपासून व्यवहार बंद केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे लेव्हीच्या प्रश्नावरून गेल्या सोळा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाल्याने त्याची दखल घेत सहकार विभागाने तसेच बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून परवाने रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आतातरी बाजार समिती प्रशासन यावर तोडगा काढून लिलाव पूर्ववत करतील, अशी अशा शेतकऱ्यांना लागली आहे. 

दुसरीकडे लासलगाव, निफाड, विंचूर बाजार समितीत कांदा लिलाव सुरु आहेत. तर दिंडोरी बाजार समितीत मात्र सोमवारपासून पूर्ववत कांदा खरेदी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमधील तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच काही संघटना तसेच व्यापारी शेतकरी यांच्या समन्वयाने खासगी कांदा लिलाव केंद्र सुरु करण्यात आले आहेत. सुरवातीला त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र आता शेतकरी यावर समाधानी नसल्याचे चित्र असल्याने बाजार समित्या सुरु व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

याबाबत मनमाड बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार म्हणाले की, जिल्हा उपनिबंधकानी संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित व्यापाऱ्यांच्या नावानिशी पत्र देखील तयार करण्यात आले आहेत. मात्र आज उद्या संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर थेट व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवणार असल्याचे खैरनार यांनी सांगितले. त्यामुळे आता पुढील एक दोन दिवसांत लेव्हीचा प्रश्न सुटतो का हे पाहावे लागणार आहे.

आधी मार्च एंडच्या कारणाने बाजार समित्या बंद झाल्या. त्या पुन्हा सुरू होण्याऐवजी हमाल मापारी व व्यापारी यांच्या लेव्हीच्या प्रश्नावरून गेल्या 15-20 दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव प्रक्रिया बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा विक्रीची मोठी गैरसोय होत असून खाजगी जागेत सुरू असलेल्या लिलाव प्रक्रियेतही शेतकरी पुर्ण समाधानी नाहीत. जिल्हा प्रशासन व बाजार समित्यांचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामध्ये त्वरित कांदा लिलाव सुरू करावेत. -  भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना

टॅग्स :कांदाशेतीनाशिकमार्केट यार्ड