Join us

नंदुरबार बाजार समितीत व्यापारी रांगड्या कांद्याला का पसंती देत आहेत? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 4:43 PM

नंदुरबार बाजारात सध्या कांद्याची उलाढाल वाढली असून व्यापारी रांगड्या कांद्याला पसंती देत आहेत.

नंदुरबार : समितीच्या कांदा मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार गत १५ दिवसांपासून दर दिवशी सरासरी २ हजार क्विंटल कांदा आवक सुरू आहे. यातून १५ दिवसातच बाजारात ३ कोटी ८० लाख रुपयांचा टप्पा पूर्ण केला आहे. गुरुवारी बाजारात विक्रमी २ हजार ६०० क्विंटल कांदा खरेदी पूर्ण करण्यात आली होती. शुक्रवारी बाजारात २ हजार २०० क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला गेला होता.

२६ जानेवारीपासून नंदुरबार बाजार समितीने साक्री रोडवरील आरटीओ कार्यालयासमोर कांदा मार्केटला प्रारंभ केला होता. पाच व्यापाऱ्यांची नियुक्ती करत सुरु झालेल्या कांदा मार्केटमध्ये मार्च अखेरीस पावणेदोन कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. या उलाढाल नंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाळी कांदा आवक सुरु झाली होती. या कांद्याला सरासरी १ हजार १५० ते १ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात येत होता. यातून नंदुरबार जिल्ह्यासह लगतच्या साक्री तालुक्यातून कांदा आवक सुरु झाली आहे. यामुळे नंदुरबार बाजारात सध्या कांद्याची उलाढाल वाढली आहे. 

दररोज २ हजार क्विंटलची आवक 

दरम्यान १ एप्रिलपासून १ हजार क्विंटल कांदा आवक सुरु झाली होती. गेल्या पाच दिवसात दररोज २ हजार ३०० ते २ हजार ६०० क्विंटल कांदा आवक सुरु झाली होती. यातून दर दिवशी २० ते २५ लाख रुपयांची उलाढाल झाल्याने गेल्या २० दिवसात ३ कोटी ८० लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर नंदुरबार कांदा बाजाराला प्रतिसाद मिळत आहे. दर दिवशी किमान २ हजार क्विटल कांदा आवक सुरु आहे. यामुळे बाजारात तेजी असल्याचे बाजार समिती सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले. 

रांगडा कांद्याला व्यापारी देताहेत पसंती

नंदुरबार येथे सध्या आवक होणारा रांगडा कांदा उत्तर भारतीय व्यापाऱ्यांची पहिली पसंती ठरत आहे. हा कांदा प्रामुख्याने दिल्ली मार्केटमध्ये पाठवण्यात येत आहे. शुक्रवारी शेतकऱ्यांनी ८० वाहनांतून कांदा आणला होता. रात्री उशिरापर्यंत किणी खरेदी केलेला हा कांदा भरुन रखाना करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. नंदुरबार तालुक्यातील विविध भागातून आलेल्या कांद्याची खरेदी करण्यासाठी व्यापारी पसंती देत आहेत. कांदा मार्केटमधून दररोज १० मालवाहू वाहने कांदा घेऊन दिल्लीकडे रवाना होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :कांदाशेतीनंदुरबारमार्केट यार्डनाशिक