Onion Market : वैजापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे खुल्या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला शेतकऱ्यांचा कांदा भिजला. (Onion Market)
दोन-तीन दिवस उघडीप पाहिल्यानंतर बाजारात शेतमाल आणलेला असतानाच, सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली.(Onion Market)
६०० वाहनांतून कांदा; अर्धा लिलाव पूर्ण, उरलेला भिजला
शनिवारी सकाळपासूनच कांद्याच्या लिलावासाठी सुमारे ६०० वाहनांनी कांदा बाजारात आणण्यात आला होता. सकाळी ४०० वाहनांचा लिलाव पार पडला.
मात्र, दुपारनंतर ४:३० वाजता सुरू झालेला दुसऱ्या सत्राचा लिलाव पावसामुळे अडथळलेला ठरला. पावसाची कोणतीही पूर्वसूचना नसल्याने शेतकऱ्यांनी उघड्यावर ठेवलेला किंवा उघड्या ट्रक/वाहनांमध्ये असलेला कांदा भिजला.
दरात घसरण; नुकसानात भर
वैजापूरसोबतच लासूर स्टेशन येथील बाजारातही शनिवारी कांद्याच्या दरात घसरण कायम होती.
सुपर कांदा
किमान दर: ८२५ रु. प्रति क्विंटल
जास्तीत जास्त दर: १,४२५ रु. प्रति क्विंटल
वाहने: ४९४
खाद/चोपडा/गोल्टी कांदा
किमान दर: १०० रु. प्रति क्विंटल
जास्तीत जास्त दर: ८२५ रु. प्रति क्विंटल
वाहने: २७५
दर कमी असतानाच पावसामुळे भिजलेल्या कांद्याच्या दर्जावर परिणाम झाला, परिणामी दुसऱ्या सत्रात दर आणखी खाली आले.
पावसाळा असल्याने वाहनधारकांनी कांदा झाकण्यासाठी व्यवस्था करायला हवी. अचानक पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांचा कांदा भिजला. - रविराज तांबे, व्यापारी
बाजार समितीचे कर्मचारी कांदा मार्केटवर नसल्याने वाहनधारक मनमानी करतात. त्यामुळे नंबरनुसार वाहनांचा लिलाव होत नाही. पाऊस आल्याने कांदा भिजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शिवाय, पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात कमी भाव मिळाला. - उत्तम साळुंके, कांदा उत्पादक शेतकरी