Join us

Onion Market : तीन महिने वाट पाहूनही कांद्याला नाही भाव; शेतकऱ्यांची आशा मावळतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:47 IST

Onion Market : उन्हाळी कांद्याचं उत्पादन घेऊन तीन महिने झालेत. हजारो शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांदा साठवून ठेवला. पण ना बाजारात उठाव, ना शासनाची खरेदी परिणामी कांदा सडल्याने शेतकरी हताश झाले आहेत.(Onion Market)

Onion Market : उन्हाळी कांद्याचं उत्पादन घेऊन तीन महिने झालेत. हजारो शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांदा साठवून ठेवला. पण ना बाजारात उठाव, ना शासनाची खरेदी परिणामी कांदा सडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. (Onion Market)

उमरा परिसरातील ही कहाणी केवळ शेतकऱ्यांच्या वेदनांचीच नाही, तर बाजार व्यवस्थेच्या उदासीनतेचीही साक्ष आहे.(Onion Market)

कांदा खूप झाला… पण भाव मात्र मिळाले नाहीत, अशी व्यथा सध्या सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या उमरा परिसरातील शेतकऱ्यांची आहे. एप्रिलमध्ये काढणी झालेल्या उन्हाळी कांद्याला अजूनही बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.(Onion Market)

विशेष म्हणजे, शासनाकडूनही कांदा खरेदी पूर्णतः बंद असल्याने शेतकरी आता खासगी व्यापाऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहिले आहेत, तेही कवडीमोल भावासाठी.(Onion Market)

अवकाळी पावसामुळे झाले मोठे नुकसान

उमरा परिसरात शेतकरी जानेवारी महिन्यापासून उन्हाळी कांद्याची लागवड करतात व एप्रिलमध्ये काढणी करतात. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

त्यातच बाजारात दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा गोदामात साठवून ठेवला. पण पावसाळ्यामुळे दर १५ दिवसांनी करावी लागणारी निसणी प्रक्रिया अधिक वेळखाऊ आणि खर्चिक ठरली. परिणामी, कांद्याची सडही सुरू झाली आहे.

खर्च वाढला, पण मिळतोय तो 'कवडीमोल भाव'

शेतकऱ्यांनी कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी साठ ते सत्तर हजार रुपयांपर्यंत खर्च केला आहे. मात्र आज बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडून केवळ १ हजार ते १ हजार १०० प्रति क्विंटल दर मिळतो आहे.

७०-८० हजार रुपये खर्च

कांदा लागवडीसाठी एकरी ८० हजार रुपये खर्च होऊन गेला आहे. आता कांदा साठवणूक ठेवलेल्या कांदा अर्ध्यापेक्षा जास्त सडून गेला. भाव वाढण्यासाठी आता किती दिवस प्रतीक्षा करावी? - ज्ञानेश्वर सावरकर, शेतकरी, उमरा

कांदा पिकावर सुरुवातीपासून खर्च जास्त करावा लागला होता. ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसान झाले. शासनाकडून खरेदी बंद असल्याने तीन महिने सांभाळून ठेवलेला कांदा खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागत आहे. - तेजस देशमुख, शेतकरी, उमरा

शासनाकडून खरेदी बंद, शेतकऱ्यांना मोठा धक्का

याआधी कांद्याचे दर कोसळले की शासनाकडून हमीभावाने खरेदी करून बाजारात समतोल राखण्याचा प्रयत्न केला जात असे. पण सध्या शासनाने कांद्याची खरेदी बंद केली असून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांवर बसला आहे. दर मिळेल या आशेने तीन महिने कांदा साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची आज उम्मीदच कोसळली आहे.

शेतकऱ्यांची मागणी काय?

* शासनाने तात्काळ कांदा खरेदी पुन्हा सुरू करावी.

* सडणाऱ्या कांद्यावर नुकसानभरपाईची योजना लागू करावी.

* व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी भाव नियंत्रण यंत्रणा सक्रिय करावी.

* शेतमाल साठवणुकीसाठी थंड साठवणूक केंद्रांची (कोल्ड स्टोरेज) व्यवस्था ग्रामीण भागात वाढवावी.

कांदा हे फक्त डोळ्यात झणझणीत पाणी आणणारे भाजीपाला नसून, शेतकऱ्याच्या जगण्याचा प्रश्न आहे.शासनाच्या उदासीनतेमुळे आणि बाजारात दर न मिळाल्यामुळे सध्या उमरा परिसरातील कांदा उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय आणि प्रत्यक्ष मदतीची गरज आहे.

हे ही वाचा सविस्तर : Onion Market : अचानक पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचा कांदा भिजला, दरातही घट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकांदाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती