नाशिक : जिल्ह्यात कांदा, द्राक्ष या दोन पिकांनंतर आता आंबा पिकाने (Mango farming) जोरदार मुसंडी घेतली असून, हे तीनही घटक नाशिकमधून सातासमुद्रापार जात आहेत. युरोप, बांगलादेश, इंडोनेशिया या देशांमध्ये कांदा अधिक प्रमाणात निर्यात होतो. द्राक्षे स्पेन, जर्मनी, इटली, युरोप आदी देशांमध्ये निर्यात होतात.
याशिवाय गेल्या तीन वर्षात नाशिक जिल्ह्यातून (Nashik District) केसर, बदाम आंब्याचे पीक घेण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. नाशिकच्या या आंब्याला अमेरिकेत पसंती मिळत आहे. नाशिक जिल्हा हा कृषिप्रधान म्हणून ओळखला जातो; मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांत अनुदानातून आंबा पीक पिकवून शेतकरी मालामाल होत आहेत. जिल्ह्यात ३५०० हेक्टरवर आंबा पीक घेण्यात आले आहे.
कळवण, सुरगाणा, सिन्नर, दिंडोरी तालुक्यांत सर्वाधिक आंबा लागवड (Amba Lagvad) होते. नाशिकचा केशर आंबा आता अमेरिकेत पोहोचला आहे. या चार तालुक्यांच्या खालोखाल निफाड तालुक्यातही आंबा लागवड वाढली आहे. तसेच केशर आंब्याची लागवड जिल्ह्यात वाढली आहे. यासाठी शेतकरी पूर्ण तयारी करत असतात. गावरान आंब्याची लागवडही चांगल्याप्रकारे आहे. गुजरातच्या केशर आंब्याला नाशिकचा आंबा भारी पडत असल्याचे दिसून येते.
द्राक्षाच्या शेतीत आंब्याचा सुगंधनिफाड तालुक्यातील रानवड येथील आंबा उत्पादक शेतकऱ्याचे लखपती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. पारंपरिक द्राक्ष शेतीला फाटा देत एका शेतकऱ्याने सहा एकरावर आंबा पिकाची लागवड केली. चार वर्षांनंतर गेल्यावर्षी १५ टन केशर आंब्याचे उत्पादन हाती आले. यातून ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. अशाच पद्धतीची आंबा शेती जिल्ह्यातील अनेक शेतकरी करत आहेत.
द्राक्षानंतर जिल्ह्यात आंबा पीकआता आंबा पिकातूनही नाशिक जिल्ह्यात कृषिक्रांती घडली आहे. फळपिकांचा विचार केला तर जिल्ह्यात द्राक्षांनंतर सर्वाधिक लागवड आंबा पिकाची झाली. त्यामुळे कांदा, द्राक्ष यानंतर आता आंबा पिकाने जिल्ह्यातील शेतकरी मालामाल झाले आहेत. जिल्ह्यात आंब्याचे लागवड क्षेत्र ३५०० हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.
मी स्वतः माझ्या शेतात आंब्याची ४०० झाडे लावली होती. त्यात केशर व दशेहरी आंब्याचा समावेश होता. झाडे लहान होती तेव्हा, त्यात सोयाबीनचे आंतरपीक घेतले. त्यामुळे मी आंब्यासह सोयाबीनचेही उत्पन्न मिळवले. माझ्याकडे आंब्याची झाडे शेतांमध्ये आहेत. आंबा पिकापासून शेतकरी समृद्ध होत आहे.- देवराम महाजन, खडकी, ता. कळवण