नाशिक : नाफेड व एनसीसीएफने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा २४ रुपये या स्वस्त दरात महाराष्ट्रातील ग्राहकांना पुरविण्याचा निर्णय घेतला होता; परंतु मागच्या आठ ते दहा दिवसांत नाशिकसह राज्यभरातील बाजारपेठांत कांद्याचे भाव घसरले.
ग्राहकांना २४ रुपयांपेक्षा कमी दराने बाजारात कांदा मिळत असल्याने नाफेडने आता ग्राहकांचा रोष नको म्हणून महाराष्ट्रात कांदा विक्रीचा निर्णय गुंडाळला आहे.
दिल्लीत नाफेडने मागील महिन्यात मोबाइल व्हॅनद्वारे कांदा विक्री सुरू केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देशाला कांदा पुरविणाऱ्या महाराष्ट्रातही २४ रुपये दराने कांदा विक्रीचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याचे दर प्रचंड घसरले असून ग्राहकांना १५ ते २० रुपये दराने कांदा मिळत असल्याने नाफेडने आपला निर्णय मागे घेतला.
दिल्लीतील स्टॉक वाढविलादेशात सर्वाधिक कांदा दिल्लीत लागतो. त्यामुळे जो कांदा महाराष्ट्रातील ग्राहकांना दिला जाणार होता, तो दिल्लीकडे वळविण्यात आला आहे. तेथील स्टॉक वाढवून ग्राहकांना अधिकाधिक कांदा स्वस्त दरात दिला जाईल.
नाफेडकडून महाराष्ट्रात २४ रुपये दराने कांदा विक्री सुरू नाही. या केवळ अफवा असून इकडे कांद्याचे भाव गडगडल्याने इतर राज्यात कांदा पुरविला जात आहे. नाफेडसह एनसीसीएफने तीन लाख मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून घेऊन आपले उद्दिष्ट पूर्ण केले होते. - आर. एम. पटनायक, शाखाधिकारी, नाफेड