Join us

नाफेड, एनसीसीएफच्या खरेदी केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी दक्षता समिती, समितीत कोण-कोण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:43 IST

Nafed Kanda Kharedi : कांदा खरेदी केंद्रावर नजर ठेवण्यासाठी आता दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे.

नाशिक : नाफेड अन् एनसीसीएफ या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून राज्यभरात ४४ खरेदी केंद्रांवर कांदा खरेदीला (Kanda Kharedi) सुरुवात करण्यात आली असून कांदा खरेदीत दोन वर्षापासूनची अनियमितता पाहता प्रत्येक खरेदी केंद्रावर नजर ठेवण्यासाठी आता दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या संदर्भातील आदेश राज्य शासनाचे अवर सचिव संगीता शेळके यांनी शुक्रवारी सायंकाळी काढले.

४३ खरेदी केंद्रांपैकी तब्बल ३८ खरेदी केंद्र एकट्या नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) आहे. तसेच जुन्नर, पारनेर, वैजापूर, संगमनेर येथील पाच खरेदी केंद्रावरही दक्षता समितीची नजर असेल. प्रत्येक ठिकाणचे तहसीलदार, बाजार समिती सचिव, सहायक निबंधक, जिल्हा पणन अधिकारी यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.

कांदा खरेदी अनियमितता किंवा प्रक्रियेदरम्यान गैरव्यवस्थापन टाळण्याच्या दृष्टीने समिती पथक नियुक्त करण्यात येत आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेली आहे व किती नोंदणीकृत शेतकऱ्यांची कांदा विक्री प्रलंबित आहे. खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या ७/१२ वर पीक पेरा सदरात कांदा पिकाची नोंद आहे काय, शेतकऱ्याला खरेदी केलेल्या कांद्याची वजन पावती दिली जाते काय आदी बाबींची तपासणी दक्षता समिती सदस्य करतील. 

कांदा खरेदीत अनियमितता होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे विविध लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी संघटनांनी केली होती. त्या अनुषंगाने व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली दक्षता समिती प्रत्येक कांदा खरेदी केंद्रावर बारकाईने नजर ठेवेल.

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड