नाशिक : बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारा ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा नीचांकी दर शेतकऱ्यांना (Kanda Market Down) आर्थिक नुकसानकारक ठरत असताना नाफेड अन् एनसीसीएफने अद्यापही कांदा खरेदी सुरू केली नाही.
मागील वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खरेदी (Kanda Kharedi) सुरू झाली होती. नाफेडमधील कांदा घोटाळा (Nafed Kanda Ghotala) गाजल्यानंतर यंदाची खरेदी वादात सापडलीय का? असा प्रश्न निर्माण होत आहे. नाफेडने बाजार समित्यांमार्फत कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
देशांतर्गत मागणी आणि जास्तीत जास्त कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या ठोस उपाययोजनांवरच कांदा दरवाढीचे (Onion Market) भवितव्य अवलंबून आहे. सन २०२३-२४ च्या हंगामात दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यात कांद्याची चांगली लागवड झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा रोपे तयार करून दोन टप्प्यांत लागवड केली. अगोदर लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिएकर चांगले उत्पादन मिळाले, तर उशिरा लागवड केलेल्या कांद्याचे उत्पादन तापमानवाढीमुळे घटले.
तरीही एकूण लागवड क्षेत्र जास्त असल्याने जिल्ह्यात कांदा उत्पादन मुबलक आहे. सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढणी पूर्ण केली असून, कमी बाजारभावामुळे कांदा चाळींमध्ये कांदा पडून आहे. त्यातच अवकाळी पावसाचा काढून ठेवलेल्या कांद्याला फटका बसत आहे.
तीन लाख टन कांदा खरेदी करणार कधी?
- बांगलादेशात स्थानिक कांदा उपलब्ध असल्याने भारतीय कांद्याची मागणी कमी आहे. केंद्र सरकारने १ एप्रिल २०२५ पासून २० टक्के निर्यात शुल्क मागे घेतले असले, तरी निर्यातीला अपेक्षित चालना मिळालेली नाही.
- केंद्राने बफर स्टॉकसाठी नाफेड २ आणि एनसीसीएफमार्फत प्रत्येकी १.५ लाख टन, म्हणजेच एकूण ३ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, ही खरेदी अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत.
- बाजार समित्यांमधील कांद्याचा ३ ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर उत्पादन खर्चही भागवत नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा साठवून पुढील काळात दरवाढीच्या अपेक्षेने प्रतवारी केली आहे.
देशांतर्गत मागणी आणि जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी कांदा निर्यातीसंदर्भातील सरकारी उपयोजना यावरच कांदा दरवाढीचे भवितव्य अवलंबून आहे. नाफेडने बाजार समित्यांमार्फत कांदा खरेदी सुरू करावी. नाफेडच्या कांदा खरेदी व्यवहारात पारदर्शकता असावी. कांद्याला भाव कमी मिळत असल्याने बळीराजाला सावरण्याची गरज आहे.- भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना