Join us

Mosambi Market : जालना बाजारात मोसंबी आवक वाढली; 'इतक्या' हजारांवर दर स्थिरावले वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:12 IST

Mosambi Market : मोसंबी हंगामाने बाजारपेठेत रंगत आणली असली तरी दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत. गुरुवारी (२१ ऑगस्ट) जालना फ्रूट मार्केटमध्ये तब्बल ३५० टनांपेक्षा जास्त मोसंबीची आवक (Mosambi arrivals) झाली. फळाच्या गुणवत्तेनुसार दर मिळाले. वाचा सविस्तर (Mosambi Market)

विष्णू वाकडे

जालना येथील फ्रुट मार्केटमध्ये आंबे बहरातील मोसंबीची आवक (Mosambi arrivals) सुरू झाली असून गुरुवारी (२१ ऑगस्ट) तब्बल ३५० टनांपेक्षा जास्त मोसंबीची आवक (Mosambi arrivals) झाली.  (Mosambi Market)

बाजारात फळांच्या गुणवत्तेनुसार मोसंबीला प्रति टन १३ ते २० हजार रुपयांचा दर मिळत आहे. या दरामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फारसा लाभ न मिळता समाधान मानावे लागत आहे.(Mosambi Market) 

पुढील काळात गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोसंबीला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांची चिंता कायम

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोसंबी फळबागा सांभाळण्यासाठी मोठी पदरमोड केली आहे. फळ टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न होत असतानाही हवामान बदल व फळगळ यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

रोग-नियंत्रण व फळगळ टाळण्यासाठीचा खर्च मोठा होत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा आर्थिक भुर्दंड बसतो आहे.

मोसंबीच्या फळबागा टिकणार तरी कशा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

आंध्र प्रदेशातील आवक परिणामकारक

सध्या आंध्र प्रदेशातूनही मोठ्या प्रमाणावर मोसंबीची आवक होत आहे. त्यामुळे जालन्यातील मोसंबीचे दर दबावाखाली आहेत.

आंध्र प्रदेशातील आवक कमी झाल्यास येथील मोसंबीला चांगले भाव मिळतील, अशी अपेक्षा आहे.

पावसामुळे वाहतूक अडचणी

अतिवृष्टीमुळे बागेतून काढलेली मोसंबी बाजारपेठेत आणताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यांवरील चिखल व पाणी यामुळे माल वाहतुकीस अडथळा येतो आहे.

त्यामुळे तोटा वाढतोय.

गौरी-गणपती उत्सवाचा फायदा?

व्यापाऱ्यांच्या मते, गौरी व गणपती उत्सवाच्या तोंडावर मोसंबीची मागणी वाढेल.

सध्या आवक जास्त असल्याने दर स्थिरावले असले तरी उत्सवकाळात चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

जालना मार्केटची वैशिष्ट्ये

जालना बाजारातील मोसंबीला दिल्ली, जयपूर, कानपूर, कोलकाता, मथुरा अशा प्रमुख शहरांतून मागणी आहे.

पूर्वी घड्याने विक्री होत असे, मात्र आता ती पद्धत पूर्णपणे बंद झाली असून किलो/टन आधारावरच खरेदी-विक्री केली जाते.

मोसंबी टप्प्याटप्प्याने बाजारात विक्रीस आणल्यास शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळेल. एकाचवेळी आवक वाढली की दर कमी होतो. पुढील महिन्यात चांगले दर मिळतील अशी अपेक्षा आहे. - अंबर घनघाव, मोसंबी उत्पादक

वडीगोद्री येथे नव्याने सुरू झालेल्या मोसंबी मार्केटमुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. वारंवार जालन्याला पायपीट करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे हे केंद्र शेतकऱ्यांसाठी सोयीचं ठरणार आहे. -  नाथा घनघाव, जिल्हाध्यक्ष, अडतीया संघटना, जालना

जालन्यातील मोसंबी बाजारपेठेत आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून दर सरासरी २० हजारांवर स्थिरावले आहेत. आंध्र प्रदेशातील आवक व पावसाचे हवामान हेच सध्या दरावर प्रभाव टाकत आहेत. आगामी उत्सवकाळ शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरेल, अशी आशा व्यक्त केली जाते.

हे ही वाचा सविस्तर : Mosambi Market : शेतकऱ्यांसाठी नवी बाजारपेठ; 'या' बाजारात पहिल्याच दिवशी मोसंबीचा उच्चांक दर

टॅग्स :शेती क्षेत्रफळेबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डजालनापुणे कृषी उत्पन्न बाजार समिती