Join us

Market Yard: पावसामुळे शेतमाल भिजण्याच्या घटना वाढल्या; बाजार समित्यांची अपुरी सुविधा उघड वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 18:02 IST

Market Yard : एकीकडे पावसाचा लहरीपणा, दुसरीकडे बाजार समित्यांची अपुरी सुविधा… या दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल (Shetmal) अक्षरशः पावसात वाहून जात आहे. अशीच घटना वाशिम बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली. वाचा सविस्तर (Market Yard)

Market Yard : एकीकडे पावसाचा लहरीपणा, दुसरीकडे बाजार समित्यांची अपुरी सुविधा… या दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल (Shetmal) अक्षरशः पावसात वाहून जात आहे. अशीच घटना वाशिम बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली.

वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना शेडमध्ये शेतमाल (Shetmal) ठेवण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने लिलाव उघड्यावरच होत आहे. परिणामी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा माल भिजून मोठे नुकसान होत आहे. या घटनांची वारंवारता वाढत असताना प्रशासनाचे आश्वासने केवळ कागदापुरतीच राहिली आहेत.

शेडमध्ये व्यापाऱ्यांच्या मालाची अधिक साठवण असल्याने शेतकऱ्यांना उघड्यावर शेतमाल (Shetmal) टाकावा लागतो. अचानक पाऊस आला की, शेतकऱ्यांची धावाधाव होते आणि शेकडो क्विंटल शेतमाल भिजून त्यांचे नुकसान होते, हा प्रकार कधी थांबणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

वाशिम जिल्ह्यात सहा मुख्य कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि तीन उपबाजार आहेत. याठिकाणी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळणे, तसेच त्यांच्या शेतमालाचे (Shetmal) संरक्षण होणे अपेक्षित आहे.

शेतमालास योग्य भाव मिळत नाहीतच शिवाय नैसर्गिक आपत्तीपासून शेतमालाचे (Shetmal) पुरेपूर संरक्षणही होत नाही. अवकाळी पाऊस (Rain) आल्यास शेतकऱ्यांचा शेतमाल (Shetmal) भिजून त्यांचे नुकसान होते. या घटना जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. मागील अठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे परत एकदा हा प्रकार समोर आला आहे.

बाजारातील शेडमध्ये असलेला व्यापाऱ्यांचा माल उचलण्यात आला असून, अतिरिक्त शेतमाल उचलण्याच्याही सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांचा माल भिजून नुकसान होऊ नये, याचीही दक्षता घतली जात आहे.  - विजय देशमुख, सचिव, बाजार समिती, रिसोड

वाशिम येथील बाजार समितीच्या शेडमध्ये अशाप्रकारे शेतमाल साठवून ठेवल्याचे चित्र पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांसाठी शेडमधील क्षमतेच्या २५ टक्के जागा राखीव असते. सध्या बाजारातील शेडमध्ये तेवढ्याच जागेत त्यांचा शेतमाल आहे. शेतकऱ्यांचा माल भिजू नये, यासाठी शेडमध्येच लिलाव घेतला जात आहे.  - वामनराव सोळंके, सचिव, बाजार समिती वाशिम

 एक, दोन व्यापारी खरेदी केलेला शेतमाल हमाल नाही, गाड़ी लोड होत नाही, अशी कारणे सांगून शेडमध्येच ठेवतात. खरेदीतील शेतमाल दुसऱ्या दिवशीच उचला, अशा नोटीस दिल्या आहेत. यापुढे बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापारी शेतमाल ठेवणार नाहीत, यासाठी कठोर निर्णय घेतला जाईल, शिवाय, नवीन शेडचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर हा प्रश्न उद्भवणार नाही.  - डॉ. संजय रोठे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मानोरा

उघड्यावर शेतमाल

मी १६ क्विंटल भुईमूग शेंगा मानोरा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणल्या होत्या. शेडमध्ये जागा नसल्याने शेंगा बाहेर टाकल्या. तेवढ्यात पाऊस आला आणि सुमारे चार क्विंटल शेंगा वाहून गेल्या. नुकसानाची भरपाई बाजार समिती प्रशासनाने द्यावी. - गौरव इंदल पवार शेतकरी, बोरव्हा

आम्ही मानोरा बाजार समितीत भुईमुगाच्या शेंगा विक्रीसाठी आणल्या होत्या. अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता आमच्या ७ क्विंटल शेंगा पाण्यात वाहून गेल्या. या नुकसानाची भरपाई आम्हाला मिळावी आणि बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी पुरेशी जागा उपलब्ध करावी. - गोपाल राठोड, शेतकरी, मानोरा

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष?

निवडणुकांच्या काळात शेतकऱ्यांना गाजर दाखवणारे लोकप्रतिनिधी, निवडून आल्यावर मात्र बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप शेतकरी करत आहेत. 

शेतमालास हमीभाव, मोफत वीज, कर्जमाफी याची आश्वासने देणारे नेते बाजार समित्यांत शेतकऱ्यांची व्यथा ऐकायला का येत नाहीत?" असा थेट सवाल उपस्थित होत आहे.

शासनाचे धोरण आणि अंमलबजावणीत तफावत

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम, १९६३ अंतर्गत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव व संरक्षण मिळणे अपेक्षित आहे. मात्र जमिनीवरचे वास्तव याच्या नेमक्या विरुद्ध आहे. आठवडा सरतो न सरतो तोच पावसामुळे शेतकऱ्यांचा माल भिजतो, आणि नुकसानाची भरपाई विचारता विचारता शेतकऱ्यांचे धावपळ होते.

नुकसान थांबणार कधी?

पेरणीपासून ते विक्रीपर्यंत संकटांचा सामना करून शेतकरी बाजारात येतो. मात्र विक्रीच्या शेवटच्या टप्प्यावरही त्याच्या नशिबी नुकसानच येते. शेड अभावी उघड्यावर ठेवलेला माल पावसात भिजतो, व्यापाऱ्यांच्या अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना शेडमध्ये प्रवेश मिळत नाही, आणि प्रशासन मात्र केवळ दिलासे देण्यात व्यस्त आहे.

हे ही वाचा सविस्तर : Solar Panel : सौरऊर्जेतील क्रांती: अकोल्यात तयार झाला स्वयंचलित स्वच्छता ड्रोन! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारबाजार समिती वाशिममार्केट यार्डमार्केट यार्ड