Join us

कांद्याच्या कट्ट्याला गावाकडं मागणी वाढली, सरासरी काय भाव मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 2:47 PM

उन्हाळ्याच्या हंगामात पावसाळ्याच्या सोयीसाठी बऱ्याच घरात कांद्याची खरेदी केली जाते.

- मुखरू बागडे 

भंडारा : उन्हाळ्याच्या हंगामात पावसाळ्याच्या सोयीसाठी बऱ्याच घरात कांद्याची खरेदी केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चौरासपट्टीतून पालांदूर येथे दररोज कांद्याचे ट्रॅक्टर गल्लीबोळातून फिरत आहेत. शनिवारी आठवडी बाजारात सुद्धा कांद्याचे कट्टे विक्रीला उपलब्ध होते. सोमवारला सुद्धा सकाळी 10 वाजतापर्यंत गावात कांद्याचा ट्रॅक्टर फिरला. 40 किलो कांद्याचा कट्टा चारशे रुपयाला शेतकऱ्यांनी थेट ग्राहकाला विकला.

भंडारा जिल्ह्यातील पालांदूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने बाजार चौकात कांदा भरलेली गाडी शेतकरी उभी करतात. शेतकरी ते ग्राहक, असा थेट व्यापार घडतो. त्यानंतर तोच लोन गावात पसरतो. ज्यांच्याकडे साधने आहेत ते थेट कांद्याच्या गाडी जवळ येतात व खरेदी करून घरी नेतात. तर काहींना साधनाअभावी थेट शेतकऱ्यालाच घरी बोलावतात. ही सेवा मात्र शेतकरी मोफत करतो. त्यामुळे ग्राहक व शेतकरी यांचे नाते वृद्धिंगत होऊन पालांदूर येथे दररोज दोन ते तीन ट्रॅक्टर कांदा विकला जात आहे. 

पाचशे रुपये कांद्याचा कट्टा

शनिवारी आठवडी बाजारात 550 रुपये ते 500 रुपये दराने कांद्याचा कट्टा विकला. मात्र रविवारपासून पालांदूर येथे कांद्याची आवक अधिक झाल्याने शेतकऱ्यांनी थेट शंभर रुपये कमी करीत चारशे रुपये कट्ट्याने कांदा विकला. ज्यांच्याकडे कार्यक्रमाचे नियोजन आहे. अशा ग्राहकांनी कांद्याची खरेदी केली.

दरवर्षी याच गावातून येतो कांदा

पालांदूर येथे दरवर्षी पवनी व लाखांदूर तालुक्यातून कांद्याची आवक होते. लाखांदूर तालुक्यातून गुंज्ञेपार, धर्मापुरी, बोथली, किन्ही तर पवनी तालुक्यातून चिचाळ, आकोट, जुनोनासह शेजारील गावातून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. पालांदुरात पुढील महिनाभर कांदा विक्री सुरू राहील.

नागपूर शहरातून कांद्याची आवक

पालांदूरला शनिवारी आठवडी बाजारात नागपूर बाजारपेठेतून सुद्धा कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. लाल व पांढरा कांदा विक्रीला उपलब्ध असतो. हॉटेल व नाश्तावळीत लाल कांद्याचा वापर अधिक होतो. घरगुती वापराकरिता परंपरेनुसार पांढऱ्या कांद्यालाच मोठी मागणी आहे. चिल्लरमध्ये 15 रुपये किलोप्रमाणे नागपुरी कांदा विकला. तर कट्ट्याने विक्रीकरिता 520 रुपयांचा दर व्यापारी सांगत होते. परंतु, पहिल्या टप्प्यात तरी गावरान कांद्यालाच ग्राहकांनी मोठी पसंती दिली, हे विशेष!

टॅग्स :कांदाशेतीनाशिकमार्केट यार्डभंडारा