Join us

Makka Bajar Bhav : मक्याचे गणित बिघडले; जाणून घ्या बाजारात कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:39 IST

Makka Bajar Bhav : निसर्गाच्या प्रकोपाने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता बाजारपेठेने आणखी एक घाव दिला आहे. जालना बाजार समितीत मक्याचे दर तब्बल ५० टक्क्यांनी घसरले असून, सोंगणी, मळणी, भाडे सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात फक्त ७०० रुपये क्विंटलचे उत्पन्न उरले आहे. (Makka Bajar Bhav)

Makka Bajar Bhav : खरीप हंगामातील कष्टाचे सोने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशांवर आता पाणी फिरले आहे. निसर्गाच्या प्रकोपानंतर आता बाजारातील भावकपातीच्या संकटाने शेतकरी अधिकच अडचणीत सापडले आहेत.  (Makka Bajar Bhav)

कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याचे दर तब्बल ५० टक्क्यांनी घसरले असून, खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हातात फक्त ७०० रुपये क्विंटल दराने उत्पन्न उरले आहे. (Makka Bajar Bhav)

मक्याचे दर कोसळले

गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, बाजरी, उडीद आणि मूग यांसारख्या खरिपातील पिकांची सोंगणी सुरू केली आहे. यामध्ये लाडसावंगी परिसरातील शेतकऱ्यांनी मक्याची काढणी करून तो विक्रीसाठी जालना बाजार समितीत नेला.

मात्र, त्यावेळी फक्त १ हजार १४ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. हाच मका गेल्या महिन्यात २ हजार ते २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात होता. दरातील या अचानक घसरणीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण आणखीनच वाढला आहे.

मी ५ ऑक्टोबर रोजी १७ क्विंटल मका जालना बाजारपेठेत नेला होता. तो १ हजार १४ रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला. सोंगणी, मळणी, भाडे, कामगार यांचा खर्च वजा केल्यावर हातात फक्त ७०० रुपये क्विंटल एवढेच उरले. बियाणे, खते, फवारणीचा खर्च धरला, तर नफा तर दूरच  आता खिशातून पैसे टाकण्याची वेळ आली आहे.- बाबूलाल बैनाडे, शेतकरी

पिकाचे उत्पादन कमी, खर्च प्रचंड आणि दर कवडीमोल अशा तिहेरी संकटात त्यांचा हंगाम पुन्हा अडकला आहे.

वाहनधारकांना ‘कमिशन’चा खेळ

लाडसावंगी परिसरातील शेतकऱ्यांसाठी जालना आणि छत्रपती संभाजीनगर दोन्ही बाजारपेठा जवळ आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडून माहिती मिळाली आहे की, जालना बाजारात व्यापारी काही खासगी वाहनधारकांना प्रति खेप २ ते ३ हजार रुपये कमिशन देतात.

त्यामुळे हे वाहनधारक शेतकऱ्यांना जालना बाजारातच मका विक्रीसाठी नेण्याचा आग्रह धरतात. परिणामी छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत मंगळवारी मक्याची आवक शून्य राहिली, तर सोमवारी तेथे मक्याला १ हजार ४०० ते २ हजार ३०० रुपये असा चांगला भाव मिळाला होता.

नवीन आवक सुरू

दर घसरले आहेत. मागील महिन्यात मक्याला अडीच हजार रुपयांचा भाव मिळत होता. आता नवीन आवक वाढताच दर कोसळले आहेत. शेतकरी चिंतेत आहेत.- राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

बाजारात नवीन मक्याची आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीदर कमी केले आहेत. मात्र, शेतकऱ्यांचा आरोप आहे की, व्यापाऱ्यांच्या संगनमतामुळे दर कृत्रिमरीत्या पाडले जात आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिक होत आहे.

शेतकऱ्यांचा आर्थिक ताण वाढला

अगोदरच अतिवृष्टी, कीड व रोगराई, खतांच्या दरवाढीचा फटका बसलेले शेतकरी आता बाजारभावातील घसरणीमुळे हताश झाले आहेत. या परिस्थितीत शेतमाल खरेदीसाठी शासनानं हस्तक्षेप करून हमीभावाने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकऱ्यांना सल्ला 

मक्याची विक्री घाईत करू नये; बाजारातील भाव स्थिर होईपर्यंत साठवणुकीची सोय असल्यास पिक सांभाळावे.

पुढील पिकासाठी लागवडीपूर्वी खर्चाचा पुन्हा आढावा घ्यावा.

बाजार समितीच्या दरमाहितीवर लक्ष ठेवून नजीकच्या बाजारात स्पर्धात्मक भाव मिळेल तिथे विक्री करावी.

कृषी विभाग आणि व्यापारी नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधून दरकपातीची कारणे नोंदवावीत.

चक्रीवादळ, पावसाचा प्रकोप आणि आता भावकपात या तिहेरी संकटात शेतकरी पुन्हा एकदा अडकला आहे. ‘सोंगणी, मळणी, भाडे जाता हातात उरलेले ७०० रुपये’ हे वास्तव ग्रामीण अर्थव्यवस्थेतील ताण अधोरेखित करते आहे.

हे ही वाचा सविस्तर : Mofat Chara Biyane : मोफत चारा बियाणे योजना : पशुपालकांसाठी सुवर्णसंधी, १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा!

English
हिंदी सारांश
Web Title : Corn prices crash: Farmers face losses in Maharashtra markets.

Web Summary : Maharashtra farmers face losses as corn prices plummet by 50% in markets. High production costs and low selling prices squeeze profits, leaving farmers with meager returns. Farmers urge government intervention for fair pricing.
टॅग्स :शेती क्षेत्रमकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीखरीप