Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maka Export : लासलगावहुन 15 हजार टन मका थेट व्हिएतनामला पाठवला, काय भाव मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:27 IST

Maka Export : मक्याला मिळणाऱ्या मोठ्या मागणीमुळे मोठ्या प्रमाणावर मका व्हिएतनामसाठी रवाना करण्यात आला आहे.

नाशिक : लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याला मिळणाऱ्या मोठ्या मागणीमुळे दोन दिवसांत कंटेनरद्वारे मोठ्या प्रमाणावर मका व्हिएतनामसाठी रवाना करण्यात आला आहे. समाधानकारक उत्पादन, चांगला दर्जा आणि परदेशी बाजारातील वाढती मागणी यांमुळे सध्या लासलगाव बाजार समितीत मक्याच्या व्यवहारात उत्साह पाहायला मिळत आहे. 

या हंगामात सलग पाच ते सहा महिने समाधानकारक पाऊस झाल्याने मक्याचे उत्पादन भरघोस झाले आहे. उत्पादनखर्च तुलनेने कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर मक्याकडे वळला. याचा परिणाम म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची प्रचंड आवक झाली असून, बाजारपेठेत व्यवहार तेजीत सुरू आहेत.

आवक वाढूनही दर समाधानकारक राहिले असून, या हंगामात मक्याला किमान १७०० रुपये, तर कमाल १९५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले आहेत. भारतासह बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ, व्हिएतनाम या देशांकडून भारतीय मक्याला मोठी मागणी आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून केवळ व्हिएतनामसाठी यंदा सुमारे १५ हजार टन मका जहाजाद्वारे पाठविण्यात आला आहे. 

लासलगाव येथून कंटेनरद्वारे मका मुंबईला रवाना केला जात असून, तेथून जहाजाने व्हिएतनामकडे त्याची निर्यात करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांच्या मते, देशांतर्गत मक्याचा दर्जा उत्तम असल्याने परदेशी बाजारपेठेत भारतीय मक्याची मागणी सातत्याने वाढत आहे.

आधार देणारे पीकसोयाबीनच्या तुलनेत मक्याच्या लागवडीचा खर्च सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी कमी येतो. शिवाय मक्याची काढणी झाल्यानंतर शेतात रब्बी हंगामात कांद्याची लागवड करता येत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळतो. कमी उत्पादनखर्च, बाजारातील स्थिर मागणी आणि निर्यातीच्या संधी यांमुळे हंगामात मका शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने 'नफा देणारे पीक' ठरत असून, भविष्यातही मक्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lasalgaon Exports 15,000 Tons of Maize to Vietnam: Prices?

Web Summary : Lasalgaon ships 15,000 tons of maize to Vietnam due to high demand. Farmers favor maize for lower costs and Rabi season benefits. Prices ranged from ₹1700 to ₹1951 per quintal, boosting farmer profits.
टॅग्स :मकामार्केट यार्डशेतीशेती क्षेत्रविएतनाम