Maize Market : मक्याचे उत्पादन यंदा भरघोस झाले असले तरी शेतकरी भावाच्या अनिश्चिततेत आहेत. मूग-उडीदाच्या भावात झालेल्या घसरणीने त्यांची चिंता वाढवली आहे. मक्यालाही आधारभूत किंमत मिळेल का? हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात आहे. (Maize Market)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या शेतकरी मोठ्या संभ्रमात आहेत. जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबा) आडत बाजारातमूग व उडदाची आवक वाढू लागली आहे. (Maize Market)
मात्र, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) या कडधान्यांना कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. मक्यालाही आधारभूत किंमत मिळेल का? (Maize Market)
मूग-उडीदाला बाजारभावात घसरण
मूग आणि उडदाच्या शेंगा वाळण्याच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे ५०-६० टक्के उत्पादन डागी झाले आहे.
गुणवत्तापूर्ण (FAQ) मूग-उडीदालाच एमएसपी मिळत असून, डागी माल बाजारात ४ हजार ते ७ हजार ५०० रुपयांदरम्यान विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही वसूल होत नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे.
एमएसपी व बाजारातील भाव (प्रतिक्विंटल)
पिक | एमएसपी (₹) | बाजारभाव (₹) |
---|---|---|
नवीन मूग | ८,७६८ | ४,००० ते ८,७०० |
नवीन उडीद | ७,८०० | ४,००० ते ७,५०० |
नवीन मका | २,४०० | (आवक सुरू नाही) |
नवीन सोयाबीन | ५,३२८ | (आवक सुरू नाही) |
बंपर हंगाम, पण भावाचा प्रश्न
जिल्ह्यात यंदा मक्याचे पीक भरघोस प्रमाणात झाले आहे. व्यापाऱ्यांच्या मते, या हंगामात सुमारे साडेतीन लाख पोते मका कृउबा समितीत येण्याची शक्यता आहे.
पुढील १५-२० दिवसांत आवक सुरू होईल, तर औषधी कंपन्या, बिअर कंपन्या आणि स्टार्च फॅक्टरीकडून मागणी वाढेल, असे सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची मागणी
सरकारने मक्यासाठी जाहीर केलेली २ हजार ४०० रुपयांची किमान आधारभूत किंमत प्रत्यक्षात लागू करावी. खरेदी केंद्र वेळेत सुरू झाली नाहीत, तर मक्यालादेखील मूग-उडीदाप्रमाणे कमी भावात विकावे लागेल.- संपराव साळुंके, शेतकरी
का कमी मिळतोय भाव ?
यंदा शेंगा वाळण्याच्यावेळी अतिपावसाचा फटका बसला. यामुळे ५० ते ६० टक्के मूग डागी झाला. उडदाच्या बाबतीतही हेच झाले. आवकी पैकी निम्मी उडीद डागी झाली. सुकलेला मूग व उडीद (एफएक्यू) असेल तरच आधारभूत किंमत मिळेल. नवीन मका १२०० ते २१०० रुपये क्विंटल विक्री होऊ शकतो. - हरीश पवार, अडत व्यापारी
आवक वाढण्याची शक्यता
जिल्ह्यात मका व सोयाबीनचा पेरा वाढला. मक्याचे पीक बंपर येणार आहे. हंगामात कृउबा समितीत सुमारे साडेतीन लाख पोते मक्याची आवक होईल. येत्या १५ ते २० दिवसांत मक्याची आवक सुरू होईल. औषधी कंपन्या, बिअर कंपन्या, स्टार्च फॅक्टरीकडून मक्याला मागणी राहिल.- राधाकिसन पठाडे, सभापती, उच्चतम कृउबा समिती
मूग-उडीदाच्या बाजारातील स्थिती पाहता, मक्याच्या भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. केंद्र सरकार व राज्य यंत्रणांनी वेळेत खरेदी केंद्र सुरू करून एमएसपीची अंमलबजावणी केली, तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा सूर सध्या जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून उमटत आहे.