Join us
Daily Top 2Weekly Top 5

Latur APMC : 'डबल एस' बारदाण्यावरून लातूर मार्केट यार्ड ठप्प; हमालांचे काम बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 10:36 IST

Latur APMC : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 'डबल एस' बारदाण्याविरोधात हमाल संघटना आक्रमक झाली असून मंगळवारी अचानक काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. ८० ते ९० किलो वजनाची पोती उचलावी लागत असल्याने हमालांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आंदोलनामुळे संपूर्ण मार्केट यार्डातील व्यवहार ठप्प झाले असून, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.(Latur APMC)

लातूर : शासनाच्या नियमांनुसार ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा बोजा हमालांकडून उचलून घेता येत नसतानाही, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अद्याप 'डबल एस' बारदाण्याचा वापर सुरू असल्याने हमालांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. (Latur APMC)

या बारदाण्यात ८० ते ९० किलोपर्यंत शेतमाल भरला जात असल्याचा आरोप करत हमाल संघटनेने मंगळवारी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे संपूर्ण मार्केट यार्डातील व्यवहार दिवसभर ठप्प झाले होते.(Latur APMC)

हमालांचा आक्रमक पवित्रा

हमाल संघटनांच्या म्हणण्यानुसार, शासनाने श्रमिकांच्या आरोग्याचा विचार करून एका पोत्याचे वजन ५० किलोपेक्षा अधिक नसावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. 

मात्र, प्रत्यक्षात लातूर बाजार समितीत डबल एस बारदाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. या पोत्यांमध्ये ८० ते ९० किलोपर्यंत माल भरला जात असल्याने तो उचलताना हमालांच्या शरीरावर गंभीर ताण येत आहे.

या समस्येमुळे अनेक हमालांना पाठदुखी, मणक्याचे विकार, सांधेदुखी आणि इतर शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. 

यासंदर्भात हमाल संघटनेने वारंवार उपनिबंधक कार्यालय आणि बाजार समिती प्रशासनाला निवेदने देऊन 'डबल एस' बारदाना बंद करण्याची मागणी केली होती. 

मात्र, प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने अखेर हमालांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

व्यवहार पूर्णपणे ठप्प

मंगळवारी सकाळपासूनच हमालांनी शेतमालाची उतरण आणि वाहनांमध्ये माल भरण्याचे काम बंद केले. परिणामी संपूर्ण मार्केट यार्डातील खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झाले. 

लिलाव प्रक्रिया थांबली, व्यापाऱ्यांना मालाची उचल करता आली नाही आणि बाजारातील दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले.

विक्रीसाठी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची वाहने दिवसभर मार्केट यार्डातच उभी राहिली. माल उतरवून घेतला गेला नसल्याने शेतकरी आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही वाहनचालकांना अतिरिक्त भाडे आणि वेळेचा फटका बसला.

व्यापाऱ्यांसमोरही अडचणी

हमालांच्या आंदोलनामुळे अडत व्यापाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. वेळेत मालाची चढ-उतार न झाल्याने व्यापाऱ्यांचे व्यवहार खोळंबले. काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी केली.

मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन कायम

डबल एस बारदाना तातडीने बंद करून शासनाचा ५० किलो वजन मर्यादेचा नियम काटेकोरपणे लागू करावा, अशी हमाल संघटनेची प्रमुख मागणी आहे. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

या आंदोलनात माणिक पाडोळे, लखन साबळे, सचिन मुंडे, नरसिंग तरपे, ज्ञानेश्वर माने, अमोल कांबळे, बालाजी जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि हमाल सहभागी झाले होते.

प्रशासनाची भूमिका महत्त्वाची

लातूर मार्केट यार्ड हे मराठवाड्यातील महत्त्वाचे कृषी बाजारपेठ केंद्र मानले जाते. येथे दररोज मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होत असते. त्यामुळे हमालांचे आंदोलन दीर्घकाळ सुरू राहिल्यास शेतकरी, व्यापारी आणि बाजार व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन यावर कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Latur APMC : लातूर बाजार समितीत नियमांची पायमल्ली; माथाडी कामगारांच्या जीवाशी खेळ!

अधिक वाचा : Tur Market : वाशिमची तूर थेट दिल्ली बाजारात; शेतकऱ्यांना क्विंटलमागे मिळाला मोठा नफा

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Market Yard paralyzed; porters strike over 'Double S' sacks.

Web Summary : Latur market yard halted as porters protested 'Double S' sacks exceeding weight limits. The strike disrupted trade, leaving farmers and traders frustrated. The union demands adherence to the 50 kg weight limit, threatening continued action until demands are met. Administration intervention awaited.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती