नाशिक : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी दत्तू दराडे यांनी दोन एकर क्षेत्रात उगवलेल्या कोथिंबीर पिकावर रोटोव्हेटर फिरवत आपला संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी ठरवून घेतलेला व्यवहार पूर्ण न केल्याने व बाजारभाव घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
दराडे यांनी कोथिंबिरीच्या लागवडीसाठी बियाणे, मशागत, खते, औषधे व मजुरी अशा पद्धतीने सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला. मात्र, व्यापाऱ्यांनी ठरावीक दराने कोथिंबीर घेण्याचे सांगूनही बाजारभाव पडल्याने खरेदीसाठी कोणीही न आल्याने त्यांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले.
दोन महिन्यांच्या कष्टाने उगवलेले पीक वाया गेले असून, बियाण्याचा खर्चदेखील वसूल न झाल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. या प्रकारामुळे केवळ दराडे नव्हे तर परिसरातील अनेक शेतकरीही कोथिंबिरीवर 'तीन चूळ पाणी सोडण्याची' वेळ आल्याचे सांगत आहेत. व्यापारी वर्ग सिन्नर तालुक्यातील गावांतील असल्याचे समजते.
परिस्थिती बिकटशेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी बाजारभावातील चढउतार आणि व्यापाऱ्यांची बेपर्वाई यामुळे त्यांची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.
आम्ही कोथिंबीर दोन एकरांवर लागवड केली व बियाणे व मशागतीसह खते, औषधे, मजुरी असा ७० ते ८० हजार खर्च झालेला असताना हा खर्च घरातून भरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.- दत्तू दराडे, शेतकरी, राजापूर