Join us

जळगाव जिल्ह्यातील कजगाव मार्केटला कापूस खरेदीला प्रारंभ, काय दर मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:32 IST

Banana Market : प्रथम विक्रीसाठी कापूस घेऊन आलेल्या भिवसन पाटील या शेतकऱ्याचा यावेळी सन्मान करण्यात आला.

जळगाव : कजगावात यंदा कपाशीची खरेदी सुरु झाली असून प्रथम विक्रीसाठी कापूस घेऊन आलेल्या भिवसन पाटील या शेतकऱ्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. यंदा कपाशीला ६ हजार ९२५ रूपये एवढा भाव मिळाला आहे.

कजगावसह परिसरात यंदा कपाशीची लागवड मागील वर्षांच्या तुलनेत कमी प्रमाणात करण्यात आली आहे. पावसाने सुरुवातीला दडी मारली असली, तरी नंतर 'ब्रेक द बाद' नंतरच्या पावसामुळे पिकांची परिस्थिती चांगली झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात बागायती पद्धतीने करण्यात आलेल्या कपाशीची वेचणी आता सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी पहिला कापूस बाजारात विक्रीस आणला. 

कजगाव हे तालुक्यातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून, येथील बाजारपेठ केळी व कपाशीच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील जवळपास ४० गावांतील शेतकरी आपल्या मालाची आवक या बाजारपेठेत करतात. या वर्षी कपाशीची लागवड कमी झाली असली, तरी काही शेतकऱ्यांनी मे महिन्यातच बागायती शेतात लागवड केल्याने काही प्रमाणात कापूस वेचणीस आला आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत पहिल्या वेचणीचा कापूस दिसू लागला आहे.

ओला आणि लाल रंगाचा कापूसही विक्रीसकपाशीची पहिली वेचणी असल्यामुळे शेतकरी ओला झालेला आणि लाल पडलेला कापूस विक्रीस आणत आहेत. ज्यांच्याकडे सुकविण्यासाठी जागेची सोय आहे, ते शेतकरी कापूस वाळवून चांगल्या भावाची प्रतीक्षा करत आहेत. अनंत चतुर्दशीच्या शुभदिनी कजगावातील व्यापारी जयप्रकाश अमृतकर आणि विकास अमृतकर यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला.

या सोहळ्याप्रसंगी अमृतकर यांनी प्रथम आलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर, काटा पूजन करून कापूस खरेदीची औपचारिक सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी ओला माल असल्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ६,९२५ रुपये इतका भाव दिला. 

टॅग्स :कापूसमार्केट यार्डशेतीशेती क्षेत्रजळगाव