Join us

Kapus Market ; कापूस उत्पादकांवर संक्रांत कायम, आता भाव केव्हा वाढतील? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 16:51 IST

Cotton Market : मकर संक्रांतीनंतर कापसाचे भाव (Cotton market) वाढतील अशी शक्यता दरवर्षी असते. कारण निर्यातीचे सौदे सुरू होत असतात.

जळगाव : सध्या तरी भाववाढीचे कोणतेही संकेत नाहीत, अशी शक्यता कॉटन बाजारातील (Kapus Bajarbhav) जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. जर भारताच्या मालाची निर्यात वाढली तर कापसाचे भाव वाढू शकतात, असा अंदाज आहे. स्थानिक बाजारात कापसाला फारशी मागणी नाही, ही मागणी वाढली तर कापसाचे भाव वाढू शकतात.

मकर संक्रांतीनंतर कापसाचे निर्यातीचे (Cotton Export) सौदे सुरू होत असतात. त्यामुळे संक्रांतीनंतर कापसाचे भाव वाढतील अशी शक्यता दरवर्षी असते. मात्र, यंदा कापसाच्या निर्यातीला उठाव नसल्याने संक्रांतीनंतरही कापसाला फारशी मागणी न वाढल्याने, भावावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे कापूस उत्पादकांवर (Cotton farmer) संक्रांत कायम असल्याचे चित्र आहे. 

यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाचे दर (Cotton Market) ६५०० ते ७ हजार ५०० दरम्यान राहिले आहेत. ७ हजार ५०० रुपये इतका दर शेतकऱ्यांना सुरुवातीला काही ठिकाणी मिळाला, मात्र तो दर जुन्या कापसाला होता. तर कापसाला हमीभाव ७ हजार ५०० रुपये एवढा असला तरी प्रत्यक्षात सीसीआयच्या केंद्रावर हा भाव मिळालेला नाही.

खान्देशात कापसाच्या ८ लाख गाठींची खरेदी... भाव वाढण्याची शक्यता कमी होत असल्याने, आता शेतकऱ्यांकडूनदेखील आपला माल विक्री केला जात आहे. खान्देशात आतापर्यंत ८ लाख गाठींची खरेदी झाली आहे. यंदा अती पावसामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हंगाम संपेपर्यंत खान्देशात १५ लाख गाठींपर्यंत खरेदी होऊ शकते, असा अंदाज खान्देश जिनिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले.

सध्याची स्थिती... सद्यस्थितीत खासगी बाजारात कापसाला ६५०० ते ७ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. काही ठिकाणी हा भाव ६५०० रुपयांपेक्षाही कमी आहे. भारताकडून दरवर्षी ३० ते ३५ लाख गाठींची निर्यात केली जाते. मात्र, यंदा आतापर्यंत १५ लाख गाठींची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या कापसाचे दर ५४ हजार गाठींप्रमाणे आहेत. तर इतर निर्यातदार देशांच्या कापसाचे दर हे ५० हजार गाठींप्रमाणे आहेत. त्यामुळे भारताच्या मालापेक्षा इतर देशांच्या मालाला आयातदार देश पसंती देत आहेत.

टॅग्स :कापूसशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डकृषी योजना