Join us

Kanda Market : कांदा निर्यातशुल्क रद्द करूनही दरात वाढ नाही, काय दर मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:09 IST

Kanda Market : निर्यात शुल्क रद्द करूनदेखील कांद्याच्या दरात फारसा बदल झाला नसल्याचे चित्र आहे. 

Kanda Market : ०१ एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क (Onion Export Duty) हटविल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यानंतर बाजारभाव वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र तीन दिवस उलटूनही बाजारात शांतता असून दर जैसे थे असल्याचे चित्र आहे. आज ०४ एप्रिल रोजी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला १३५० रुपये दर मिळाला आहे. 

नाशिकसह (Nashik Kanda Market) राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समिती मार्च एंडच्या (March End Onion Market ) सुटीनंतर २ एप्रिल रोजी सुरू झाल्या आहेत. तत्पूर्वी कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने कांदा बाजार वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करूनदेखील कांदा व लाल कांद्याच्या दरात फारसा बदल झाला नसल्याचे चित्र आहे. 

शेतकरी वर्गाची अनेक दिवसांपासूनची निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी सरकारने मंजूर केली. मार्च एंडनिमित्त नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद होते. हे लिलाव २ एप्रिल रोजी सुरू झाले. लिलावाच्या पहिल्याच दिवशी लासलगाव बाजारात चांगल्या प्रतीच्या उन्हाळ कांद्याला ७०० रुपये ते १२५० रुपये भाव प्राप्त झाला.

तर या निर्णयाच्या तीन दिवसानंतर म्हणजेच आज रोजी लासलगाव बाजारात लाल कांद्यास ५०० ते ११०० इतका भाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याची आवक ३५५ नग होती. उन्हाळ कांद्याला ७०० रुपये ते सरासरी १३५० रुपये भाव मिळाला. शिवाय आवक देखील वाढली आहे, मात्र गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आवक घटण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक