सुभाष कवडे
अस्मानी-सुलतानी संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता कांद्याच्या भावातील मोठ्या घसरणीने चटका दिला आहे. (Kanda Market Update)
शेतकऱ्यांना कांद्याच्या बाजारभावाने मोठा धक्का दिला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर कांद्याला फक्त १२५ रु. प्रतिक्विंटल दर मिळाला, तर वाहतूक, हमाल, तोलाई असे खर्च वजा केल्यावर शेतकऱ्यांच्या हाती उरले केवळ ११ रु. मेहनत, खर्च आणि प्रतीक्षेनंतर इतका कमी मोबदला मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत आहे.(Kanda Market Update)
परसोडा येथील जनार्दन कवडे, किरण कवडे आणि गणेश कवडे या शेतकऱ्यांनी काढलेला कांदा विक्रीसाठी जाधववाडी बाजार समितीत नेला. मात्र, मिळालेला भाव इतका कमी होता की सर्व खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ ११ रुपये उरले.(Kanda Market Update)
भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल
जनार्दन कवडे यांनी दोन एकरांमध्ये कांदा घेतला होता.
किरकोळ पावसाच्या अभावामुळे उत्पादन कमी झाले, तरीही चांगल्या भावाच्या आशेने त्यांनी कांदा चार महिने चाळीत साठवून ठेवला.
गुरुवारी विक्रीसाठी नेलेल्या कांद्याला १२५ रुपये प्रतिक्विंटल एवढाच भाव मिळाला.
किरण कवड्यांना २०० रुपये, तर गणेश कवड्यांना १२५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
खर्च प्रचंड; उत्पन्न नगण्य
कांदा उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चाचे तपशील असा आहे.
खर्चाचा प्रकार | रक्कम (₹) |
---|---|
नांगरणी | २,००० |
रोटाव्हेटर | २,००० |
वाफे तयार करणे | १,५०० |
बियाणे | ९,००० |
लागवड खर्च | १२,००० |
खत व औषधे | १५,००० |
काढणी | १२,००० |
चाळीत नेणे | ७,००० |
विक्रीला नेणे | १०,००० |
एकूण खर्च | ७०,५०० |
क्विंटलला मिळालेला भाव इतका कमी होता की लागवडीचा खर्चसुद्धा वसूल होऊ शकला नाही.
बाजारातील स्थिती
जाधववाडी बाजार समितीत गुरुवारी ६ हजार ७८५ क्विंटल कांदा आला.
आवक वाढल्याने भाव घसरून १२५ ते १ हजार २०० प्रतिक्विंटल एवढा राहिला.
किरकोळ बाजारात कांदा १८ ते २० किलो दराने विक्री होत आहे.
शेतकऱ्यांची व्यथा
दोन एकर कांद्याचा खर्च ७० हजार रुपये आला. भाव चांगला मिळेल म्हणून साठवून ठेवला होता. पण शेवटी विक्रीला नेल्यावर सर्व खर्च वजा करून हाती केवळ ११ रुपये मिळाले. मेहनतीचे काहीच चीज झाले नाही.- जनार्दन कवडे, शेतकरी, परसोडा
कांदा उत्पादनावर येणारा प्रचंड खर्च, भावातील अस्थिरता आणि साठवणुकीतील नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. सरकारने दरवर्षीच्या या समस्येकडे गांभीर्याने पाहून हमीभाव व बाजारव्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
मेहनतीला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, नाहीतर शेतकरी शेतीकडे पाठ फिरवतील, अशी चिंता स्थानिक शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.