Join us

दिवाळीनंतरचे दोन दिवस लासलगाव कांदा मार्केट कसे राहिले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:06 IST

Lasalgoan Kanda Market : दीपावली सणानिमित्त झालेल्या सात दिवसांच्या सुट्टीनंतर शुक्रवारी पुन्हा कांदा लिलावास सुरुवात झाली.

नाशिक : आशिया खंडातील सर्वांत मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजार आवारात दीपावली सणानिमित्त झालेल्या सात दिवसांच्या सुट्टीनंतर शुक्रवारी पुन्हा कांदा लिलावास सुरुवात झाली. मात्र गेल्या दोन दिवसात आवकेत कोणतीही सुधारणा नसून भावही कमीच आहेत.

पहिल्याच दिवशी एकूण १८७ वाहनांमधील सुमारे २ हजार ७७० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. किमान दर असून शनिवारी देखील सुधारणा झाली नाही. कांद्याला किमान दर ४०० रुपये, कमाल दर १४१५ रुपये, तर सरासरी दर ११०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या साठवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

शुक्रवारी पहिलाच लिलाव असल्याने कांद्याची आवक अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात राहिली. काही दिवसांत लाल कांद्याची नवी आवक वाढण्याची शक्यता आहे. आवक कमी असूनही कांद्याच्या दरात विशेष वाढ दिसून आलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांदा आवकेत वाढ होऊन दर घसरण्याची शक्यता आहे.

लक्ष्मीपूजनानंतर चांगल्या दरांच अपेक्षा होती. मात्र, पूर्वीप्रमाणेच भाव स्थिर राहिले. केंद्र सरकारने तातडीने निर्यातवाढीचे निर्णय घ्यावेत. राज्य सरकारने केंद्राकडे ठोस प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांन न्याय मिळवावा.- निवृत्ती न्याहारकर, अध्यक्ष, बळीराजा बहुउद्देशीय शेतकरी गट

नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदी धोरणांमुळे शेतकऱ्यांना फटका बसला. ग्राहकांनाही विशेष फायदा झाला नाही. आवक कमी असूनही कांद्याच्या दरात विशेष वाढ दिसून आलेली नाही.- शेखर कदम, शेतकरी, कातरणी

 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीनाशिक