नाशिक :कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या (Onion Farmers) खात्यावर तब्बल २०० कोटींचे थकीत पेमेंट अदा करण्यास उशिरा का होईना सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. कालच संबंधित शेतकऱ्यांनी नाफेड कार्यालयासमोर पेमेंट अदा करावे, यासाठी आंदोलन केले होते. अखेर या आंदोलनाला यश येत असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे कांदा बाजारातील (Kanda Market Down) घसरण दुसरीकडे नाफेड, एनसीसीएफ या संस्थांनी घाईघाईत केलेली कांदा खरेदी यामुळे शेतकरी चिंतेत होते. 'नाफेड' व 'एनसीसीएफ' या संस्थांद्वारे सुमारे तीन लाख मेट्रिकटन कांद्याची खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दोन महिन्यांनंतरदेखील या कांद्याचे पैसे उत्पादकांकडे वर्ग करण्यात आले नव्हते.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांची भेट घेऊन थकीत अनुदान देण्याची मागणी केली होती. केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वतीने भाव स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ' या संस्थांद्वारे प्रत्येकी दीड लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते. सरकार बफर स्टॉकमधील कांदा मोठ्या शहरांमधील बाजारात २४ रुपये प्रतिकिलो दराने विक्रीसाठी आणते आहे.
यंदा कांद्याची लागवड कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने आवक मोठ्या प्रमाणावर झाली. सध्या कांद्याला कमी भावच मिळत असल्याने थकीत पैसै द्यावे, अशी मागणी होत होती. नवरात्रोत्सवाच्या अगोदर थकीत पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर येत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक पैसे अडकले होते.