Join us

Kanda Farmers Andolan : आजच्या आज निर्यातशुल्क हटवा, अन्यथा...  कांदा उत्पादक रस्त्यावर, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:31 IST

Kanda Farmers Andolan : गेल्या अनेक दिवसांपासून निर्यात शुल्क (Export Duty) हटवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यातच कांदा बाजारभाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच आहे.

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून निर्यात शुल्क (Export Duty) हटवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यातच कांदा बाजारभाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह संघटना रस्त्यावर उतरल्या असून आजच्या आज निर्यात शुल्क हटवण्यात यावे, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण (Onion Market Down) झाले आहे. लासलगाव बाजारात कमीत कमी १२०० रुपये पासून ते सरासरी १८०० ते १९०० रुपयांपर्यंत भाव खाली उतरले आहेत. दुसरीकडे निर्यात शुल्क हटवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी करत आहेत. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे शेतकरी आणि कांदा उत्पादक संघटना लासलगाव येथे रस्त्यावर उतरत सरकारचा (Farmers Protest) निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, लासलगाव बाजार समितीत उपस्थित सर्व शेतकरी केंद्र राज्य सरकारकडे मागणी करत आहोत की सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेल्या 20 टक्के निर्यात शुल्क आजच्या आज पूर्णपणे हटवावे. दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने निर्यात शुल्क शून्य करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा लासलगाव सह राज्यातील सर्व बाजार समित्या बंद करून राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, याची नोंद शासनाने घ्यावी असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा कांद्याचे दर घसरत आहेत. शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे आजच्या आज निर्यात शुल्क हटवावे. अन्यथा सर्व कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर येतील. रास्ता रोकोसह राज्यव्यापी आंदोलने केले जातील. एकीकडे निर्यात बंदीचे निर्णय २४ तासांत घेतले जातात, दुसरीकडे निर्यात शुल्क हटविण्याची अनेक दिवसांपासूनची आहे, मात्र त्यावर सरकार गप्प आहे. त्यामुळे आता शेतकरी गप्प बसणार नाही, सरकारने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. - भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरी आंदोलनशेतकरी संपनाशिक