Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda BajarBhav : शेतकऱ्यांना रडविल्यानंतर कांदा होतोय किमतीत 'लाल'; जाणून घ्या बाजारभाव सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 10:54 IST

Kanda BajarBhav : काही दिवसांपूर्वी मातीमोल भावाने शेतकऱ्यांना रडवणारा कांदा आता किमतीत 'लाल' झाला आहे. आवक घटणे, चंपाषष्ठीनंतर वाढलेली मागणी आणि उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे बाजारात किलोमागे १० रुपयांची वाढ झाली असून सध्या कांदा २५ ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. (Kanda BajarBhav)

Kanda BajarBhav : काही दिवसांपूर्वी मातीमोल दराने विक्री होत असलेल्या कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले होते. मात्र, आता चित्र बदलत असून कांद्याच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. (Kanda BajarBhav)

बाजारात किरकोळ विक्रीत कांद्याचे भाव किलोमागे १० रुपयांनी वाढून २५ ते ३० रुपये झाले आहेत. त्यामुळे घरगुती बजेटवरही याचा परिणाम जाणवू लागला आहे.(Kanda BajarBhav)

गुलाबी थंडी, बाजरीची भाकरी, ठेचा आणि सोबतीला कांदा-हिवाळ्यातील हा पारंपरिक मेजवानीचा अविभाज्य घटक असलेला कांदा आता थोडा महाग होत चालला आहे. (Kanda BajarBhav)

काही दिवसांपूर्वी हाच कांदा १० रुपये किलोपर्यंत घसरलेल्या दराने विकला जात होता. त्या काळात उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते.(Kanda BajarBhav)

आवक घटली, भाव वाढले

सध्या बाजारात जुन्या कांद्यासोबतच नवीन कांद्याची आवक सुरू असली तरी अपेक्षेपेक्षा आवक कमी आहे. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी ३ हजार १४० क्विंटल कांद्याची आवक झाली होती.

शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असतानाही अडत बाजारात २५ ते ३० क्विंटल कांद्याची आवक नोंदवली गेली. आवक घटल्याचा थेट परिणाम किमतींवर झाला असून ठोक बाजारात कांद्याच्या भावात ५०० ते १,००० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

होलसेल विक्रीत नवीन कांदा २ हजार ते २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल, तर जुना कांदा १ हजार ५०० रुपयांपासून पुढे दराने विकला जात आहे. परिणामी किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढून २५ ते ३० रुपये किलो झाले आहेत.

चंपाषष्ठीनंतर मागणीत वाढ

चंपाषष्ठी सणानंतर कांद्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक कुटुंबांमध्ये मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीपर्यंत कांदा न खाण्याची परंपरा असल्याने त्या काळात मागणी कमी असते. मात्र, सण संपताच कांद्याची मागणी झपाट्याने वाढली आहे.

औरंगपुरा भाजी मंडईत, जिथे दररोज सुमारे ५० क्विंटल कांद्याची विक्री होत असे, तेथे आता ७५ क्विंटलपर्यंत विक्री होत असल्याचे कांदा विक्रेते संजय वाघमारे यांनी सांगितले. यामध्ये नवीन कांद्याला जास्त मागणी आहे.

साठवणुकीत नुकसान, उत्पादनावरही परिणाम

भाव वाढतील या अपेक्षेने अनेक उत्पादकांनी जुन्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली होती. मात्र, त्यापैकी सुमारे ६० टक्के कांदा खराब झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यासोबतच अतिपाऊस आणि थंडीचा फटका नवीन कांद्याच्या उत्पादनालाही बसला आहे.

जाधववाडी बाजारात ठोक विक्रीत कांदा २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात असला तरी परजिल्ह्यात हा दर २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे.

मागणीच्या तुलनेत आवक आणखी कमी राहिली, तर येत्या काळात कांद्याचे भाव ५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज अडत व्यापारी विशाल पाडसवान यांनी व्यक्त केला आहे.

एकूणच, काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना रडवणारा कांदा आता किमतीत ‘लाल’ होत असून, या दरवाढीचा परिणाम शेतकरी आणि ग्राहक दोघांवरही होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यातील आवक, साठवणूक आणि मागणी यावर पुढील भाववाढ किंवा स्थिरता अवलंबून राहणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : E-Pik Pahani offline : ई-पीक पाहणी चुकली तरी चिंता नको; शेतकऱ्यांना ऑफलाइन पीक नोंदणीची संधी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकांदाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड