Jowar Kharedi : रब्बी व पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेतून चालवली जाणारी ज्वारी खरेदी ३० जून रोजी थांबल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली होती.(Jowar Kharedi)
चिखली आणि जलधरा येथील खरेदी केंद्रे बंद पडल्याने १ हजार १२३ शेतकऱ्यांची ज्वारी अजूनही घरात पडून आहे. मात्र, 'लोकमत ॲग्रो'ने हे वास्तव अधोरेखित करताच, शासनाने याची दखल घेत २० जुलैपर्यंत खरेदीची मुदतवाढ दिली आहे.(Jowar Kharedi)
तरीही शेतकऱ्यांच्या मनात अजूनही प्रश्न आहेत भर पावसाळ्यात ही ज्वारी तोलली जाईल का? गोदाम उपलब्ध होईल का? बारदाना पुरेल का? कारण मुदतवाढीची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष कामकाजासाठी आवश्यक सोयीसुविधांचा पत्ता नाही.(Jowar Kharedi)
केंद्र व राज्याकडून निर्णय
४ जुलै रोजी 'शासकीय गोंधळाचा फटका; हजारो क्विंटल ज्वारी खरेदीविना पडून' या मथळ्याखाली 'लोकमत ॲग्रो'ने बातमी प्रकाशित केली होती. त्यात मुदतवाढ द्या किंवा नुकसानभरपाई द्या, अशी मागणी केली होती.
या वृत्ताची दखल घेऊन ४ जुलै रोजी केंद्र शासनाने पत्र पाठवले. त्यानंतर ७ जुलैला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देत २० जुलैपर्यंत ज्वारी व इतर भरडधान्य खरेदी सुरू ठेवण्याचे आदेश दिले.
गोदामाची टंचाई, बारदाना प्रश्न कायम
मुदतवाढीची घोषणा झाली खरी, पण प्रत्यक्ष खरेदीसाठी गोदाम उपलब्ध होईल का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महामंडळाने तहसील कार्यालयाला पत्र लिहून गोदाम उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मात्र, आता उरलेले केवळ १३ दिवस आणि पावसाळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी पाहता १ हजार १२३ शेतकऱ्यांची ज्वारी वेळेत तोलली जाईल का, यावर शंका व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न अनुत्तरित
गोदाम उपलब्ध होईल का?
बारदाना वेळेवर मिळेल का?
पावसात ज्वारी भिजून जाणार का?
१३ दिवसांत एवढ्या शेतकऱ्यांची ज्वारी तोलून होईल का?
शेतकऱ्यांचा संताप
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, मुदतवाढीची केवळ पत्रके नकोत, आमची ज्वारी घरातून प्रत्यक्ष गोदामात पोहोचली पाहिजे. वेळेत खरेदी न झाल्यास आम्हाला मोठे नुकसान होईल.
येणारा काळच ठरवेल
उरलेल्या १३ दिवसांत सरकारने आवश्यक तयारी केली नाही, तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा प्रशासनाच्या गोंधळाचा फटका बसणार आहे. त्यामुळे वेळेत गोदाम व बारदाना पुरवून शेतकऱ्यांची ज्वारी तोलून घेण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.