जळगाव : प्लास्टिक नगरी जळगावातून आखाती देशांमध्ये होणारी चटईची निर्यात युद्धामुळे ठप्प झाली आहे. मागणी केलेला माल (ऑर्डर) सातही आखाती राष्ट्रांनी न पाठविण्याविषयी कळविल्याने जळगावातील चटई उद्योगांचे नियोजन कोलमडले आहे. ऑर्डरप्रमाणे तयार माल पडून आहे व दुसरीकडे आता निर्मिती करावी की नाही, असा प्रश्न चटई उत्पादकांपुढे निर्माण झाला आहे.
जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरात डाळीसह चटईचेदेखील मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. येथे असलेल्या २०० चटई उद्योगांमधून आकाराला येणाऱ्या चटई देशाच्या विविध भागांसह २५ वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात होऊन या माध्यमातून देशाला वार्षिक १०० कोटींच्या वर परकीय चलन मिळते. चटईचे प्रमुख ग्राहक देश म्हणजे आखाती देश आहेत.
माल ठेवावा कोठे?चटई हा फुगार माल असतो. तो ठेवण्याविषयी जागेची मोठी अडचण असते. आता तयार माल पडून आहे, नवीन तयार होणारा माल कोठे ठेवावा, असाही प्रश्न उत्पादकांना पडला आहे. ८ ते १० दिवसात युद्ध न थांबल्यास उत्पादन थांबवावे लागेल, असेही उत्पादकांचे म्हणणे आहे. यमेन, कतार, दुबई, सौदी अरेबिया, अबू धाबी याठिकाणी मोठ्या प्रमाणात चटई निर्यात होतात. मात्र, सध्या अमेरिका व इराण यांच्यातील युद्ध भडकल्याने तेथील जनजीवनासह व्यापार क्षेत्राचीही घडी विस्कटली आहे. याचा थेट परिणाम जळगावातील चटई उद्योगांवर झाला आहे.
माल न पाठविण्याचे संदेशजळगावातून दर महिन्याला चटईंचे २० ते २५ कंटेनर आखाती देशांमध्ये जातात. त्यानुसार या देशांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार जळगावातील चटई उद्योगांमध्ये माल तयार झाला. मात्र, युद्ध भडकल्यानंतर १ मार्च रोजी मागणी केलेला माल सध्या न पाठविण्याविषयी आखातातील सात देशांनी कळविले आहे. त्यामुळे जळगावातील उद्योगांसह मुंबईत वेअर हाऊसमध्ये हा माल पडून आहे.
जळगावात तयार झालेल्या चटई आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. मात्र, युद्धामुळे आखाती देशांनी ऑर्डर न पाठविण्याविषयी कळविले आहे. त्यामुळे तयार चटई कंपन्यांमध्ये व मुंबईत अडकून पडल्या आहेत. ऑर्डर थांबल्याने या उद्योगाचे सर्व नियोजन कोलमडले आहे.- महेंद्र रायसोनी, अध्यक्ष, जळगाव मॅट मॅन्युफॅक्चरर असोसिएशन.
Web Summary : War halts Jalgaon's mat exports to Gulf countries. Seven nations cancelled orders, disrupting production. Manufacturers face storage issues as existing stock piles up, threatening industry slowdown if conflict persists.
Web Summary : युद्ध के चलते खाड़ी देशों को जलगाँव का चटाई निर्यात रुका। सात देशों ने ऑर्डर रद्द किए, जिससे उत्पादन बाधित हुआ। निर्माताओं को भंडारण की समस्या का सामना करना पड़ रहा है क्योंकि मौजूदा स्टॉक जमा हो रहा है, जिससे संघर्ष जारी रहने पर उद्योग में मंदी का खतरा है।