Join us

Nafed Soyabean : नाफेडकडून मूग-सोयाबीनची किती झाली खरेदी? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 16:42 IST

Nafed Soyabean : महाराष्ट्रात नाफेडचे सोयाबीन (NAFED Soyabean) खरेदीचं टार्गेट होतं १३ लाख टन, प्रत्यक्षात खरेदी किती झालीय

Nafed Soyabean : केंद्र सरकारने यंदा सोयाबीनला (Soyabean MSP) ४ हजार ८९२ रूपये प्रतिक्विंटलचा दर जाहीर केलाय. नाफेडच्या हमीभाव केंद्राने किती सोयाबीन आणि मूग खरेदी केले हे नाफेडच्याच या अधिकृत आकड्यातून समोर येईल. केवळ महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर १३ लाख ८ हजार २३८ टन सोयाबीन हमीभावाने (Soyabean Market) खरेदी करण्याचे लक्ष्य होते. त्यातील केवळ ३ हजार ८८७ टन सोयाबीन खरेदी करण्यात आलीये. अजून १२ दिवस ही खरेदी चालू असणार आहे.

मुगाला ८ हजार ६८२ रूपये प्रतिक्विंटल दर हा केंद्र सरकारने जाहीर केलाय. तर नाफेडच्या हमीभाव (Mug Market) केंद्राकडून महाराष्ट्र राज्यातील १७ हजार ६८८ टन मूग खरेदी करण्याचे लक्ष्य होते. पण त्यातील केवळ ७ टन ४ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला आहे. आता त्याची मुदत जानेवारी २०२५ पर्यंत आहे. तोपर्यंत नाफेड पूर्णपणे खरेदी करेल हे पाहावे लागणार आहे. विशेष म्हणजे, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक या राज्यापेक्षा महाराष्ट्रातून सर्वात कमी मुगाची खरेदी झाल्याचे यातून समोर आले आहे. 

सध्या बाजारात सोयाबीनला ३ हजार ५०० रूपयांपासून, चांगल्या सोयाबीनला ४ हजार ५०० रूपयापर्यंत दर मिळतोय. तर मुगाला ४ हजार ५०० ते ७ हजार रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाने कुठेच शेतमाल खरेदी होताना दिसत नाही. नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्राकडूनही लक्ष्याच्या १ टक्क्यापेक्षा कमी माल खरेदी झाल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे.  

नाफेडचा खरेदीसाठी हात आखडता

एकीकडे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहेत. या दोन्ही राज्याकडून नाफेड १३ लाख मेट्रिक टन इतकी सोयाबीनची खरेदी करणार आहे. याची मुदत मध्य प्रदेशसाठी ३१ डिसेंबरपर्यंत आहेत. तर महाराष्ट्रासाठी १२ जानेवारी २०२५ पर्यंत आहे. यात महाराष्ट्र राज्याकडून अद्यापपर्यंत ०.२ टक्के इतकी खरेदी झालीय. तर मध्य प्रदेशाकडून ०.७ टक्के इतकी खरेदी झाली आहे. एकीकडे शेतकरी बाजारात सोयाबीन साडे तीन हजार रूपयांपासून ४ हजार १०० रुपयांपर्यत विक्री करत असतांना नाफेड खरेदीसाठी हात आखडता घेत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 

हेही वाचा : Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीनची आवक झाली कमी; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डशेती क्षेत्रमहाराष्ट्र