जळगाव : हरभऱ्याच्या ताज्या भाजीला बाजारपेठेत चांगली मागणी आणि समाधानकारक दर मिळत आहे. ग्रामीण भागात आवडीने खाल्ली जाणारी हरभऱ्याची पालेभाजी आता शहरातील बाजारपेठेतही लोकप्रिय ठरत आहे. साधारण २० ते २५ रुपयांना भाजीचा वाटा विकला जात आहे.
गेल्या आठवड्यापासून दररोज बाजारात हरभऱ्याच्या भाजीची आवक जोरात सुरू आहे. ही भाजी रोजच्या वापरात नसली, तरी हंगामात ग्रामीण भागात ती आवर्जून घेतली जाते. ताजी भाजी वापरल्यानंतर उर्वरित भाजी वाळवून पुढील काळासाठी साठवण्याची पद्धतही प्रचलित आहे.
ग्रामीण, शहरी भागात २० ते २५ रुपयांत विक्री
सध्या ग्रामीण व शहरी भागात हरभरा भाजीची विक्री वाटा पद्धतीने २० ते २५ रुपयांपर्यंत होत असून, ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठवडी बाजारात ही भाजी विशेष आकर्षण ठरत आहे.
भाजी खुडल्याने वाढते उत्पादन
हिवाळ्यात थंडी वाढल्यानंतर हरभऱ्याच्या पिकाची वाढ जोमाने होते. ज्या शेतात पाण्याची सोय आहे, त्या ठिकाणी हरभरा उत्पादनास चांगला वाव मिळतो. झाडाच्या मुळाला धक्का न लावता कोवळे शेंडे खुडल्यास पिकाला डेरे फुटतात. त्यामुळे पुढे फूलधारणा व फळधारणा वाढून एकूण उत्पादनात भर पडते. यामुळे अनेक शेतकरी भाजी खुडण्यास प्राधान्य देत आहेत.
शेंडे तोडल्याने झाडाची वाढ
हरभऱ्याच्या झाडाचे शेंडे तोडल्यानंतर झाडाची वाढ चांगली होते आणि पुढे भरघोस उत्पादन मिळते. भाजी विक्रीतून उत्पन्न आणि नंतर दाण्यांमधून दुसरे उत्पन्न मिळत पीक लाभदायक ठरत आहे.
Soyabean Market : जानेवारी महिन्याचे पुढील पंधरा दिवस सोयाबीनचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर
