Halad Market Update : हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये यंदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या. व्यापारीही भाववाढीची शाश्वती देत नाहीत, त्यामुळे हळदीची आवक कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांनी साठवणुकीचा पर्याय निवडला आहे. (Halad Market)
मराठवाडा आणि विदर्भात प्रसिद्ध असलेल्या हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात यंदा हळदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. (Halad Market)
यार्डात दरवर्षी विक्रमी हळद आवक होत असते. मात्र, यंदा हळदीला गतवर्षीच्या तुलनेत प्रतिक्विंटल दोन ते तीन हजारांनी कमी दर मिळत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत क्विंटलमागे एक ते दीड हजारांची घट नोंदविली गेली आहे. परिणामी, आवकही मंदावली आहे.(Halad Market)
दर घसरल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्याचा थेट परिणाम हिंगोली बाजारातील हळदीच्या आवक वर झाला आहे. दररोज सुमारे तीन ते चार हजार क्विंटल हळदीची आवक अपेक्षित असते. (Halad Market)
परंतु सद्यस्थितीत केवळ दीड हजार क्विंटलच्या आसपासच हळद मार्केट यार्डात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे बाजारपेठेत असलेली खरेदीही मंदावली आहे. योग्य दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी साठवणुकीचा पर्याय निवडला आहे.(Halad Market)
मार्केट यार्डातील हळदीचे दर
दिनांक | आवक (क्विंटल) | सरासरी भाव (₹/क्विंटल) |
---|---|---|
१ जुलै | २,१०० | ११,७५० |
३ जुलै | २,०५० | ११,५०० |
४ जुलै | १,८०० | ११,५०० |
व्यापारीही देईनात भाववाढीची शाश्वती
येथील मार्केट यार्डात गेल्यावर्षी हळदीला प्रतिक्विंटल सुमारे १४ ते १५ हजारांचा दर मिळाला होता. यंदा मात्र, १२ ते १२ हजार ५०० रुपयांवर भाव गेला नाही. भाववाढीच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली आहे. एकूण परिस्थिती पाहता, व्यापारीही भाववाढीची शाश्वती देण्यास तयार नाही.